जेव्हा एखादी नोकरी करीत असताना तुम्ही अनेक वर्षं कंपनीबरोबर काम करण्यात घालवता तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अगदीच खास ठरतो. मग त्या खास दिवशी कंपनीकडून कामाची पोचपावती म्हणून बोनस, सेलिब्रेशन किंवा एखादी भेटवस्तू मिळेल, अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. ॲपल कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला १० वर्षं पूर्ण होतात. या गोष्टीचं निमित्त साधून मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक कर्मचाऱ्याला एक खास भेटवस्तू देतात.
या ॲपल कर्मचाऱ्याचं नाव मार्कोस अलोन्सो असं आहे. तसेच या कंपनीत तो ह्युमन इंटरफेस डिझायनर (Human Interface designer at Apple) या पोस्टवर होता. ॲपल कंपनीत त्यानं १० वर्षं काम केलं. या क्षणाला आणखीन खास करण्यासाठी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक कर्मचाऱ्याला भेटवस्तू पाठवली. ही भेटवस्तू अगदीच अनोखी अशी आहे. ही भेट एखाद्या स्मृतिचिन्हाप्रमाणे आहे. पांढऱ्या रंगाच्या कागदानं पॅक केलेला बॉक्स उघडताच एक वस्तू दिसते; जी ॲल्युमिनियमने बनवलेली आहे आणि त्याच्या मध्यभागी एक चमकणारा ॲपलचा लोगो आहे. कर्मचाऱ्याने ही भेटवस्तू उघडतानाचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. ॲपल कर्मचाऱ्याला दिलेली ही खास भेटवस्तू एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.
पोस्ट नक्की बघा :
भेटवस्तूची खास वैशिष्ट्ये :
ॲल्युमिनियमने तयार केलेल्या या भेटवस्तूवर ॲपलचा लोगो तर आहेच. पण, त्याचबरोबर कर्मचाऱ्याला कंपनीत १० वर्षं झाली हे अंकात नमूद करण्यात आलं आहे आणि त्याखाली २८ ऑक्टोबर २०२३ ही तारीख आणि कर्मचाऱ्याचं नावदेखील लिहिलेलं आहे. तसेच टीम कूक यांनी या कर्मचाऱ्यासाठी खास संदेशही लिहिला आहे. ‘१० वर्षं’ असं वर इंग्रजी अक्षरात लिहून, “अभिनंदन! तुम्ही केलेलं काम, तुम्ही जी आव्हानं पेलली आणि तुम्ही जे यश मिळवलं अशा सर्व बाबींनी ॲपलच्या मिशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यामुळे कंपनीच्या वतीनं ॲपल मधील सर्व जण, तुम्ही आमच्याबरोबर एकत्र प्रवास केल्याबद्दल धन्यवाद म्हणतो,” असा संदेश भेटवस्तूसोबतच्या कागदावर लिहून टीम कूक यांनी स्वाक्षरी केली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @malonso या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘१० वर्ष ॲपल कंपनीत’ अशी कॅप्शन कर्मचाऱ्याने या पोस्टला दिली आहे आणि भेटवस्तू खोलून दाखवतानाचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. अनेक जण पोस्ट पाहून या ॲपल कर्मचाऱ्याचं कौतुक करीत आहेत; तसेच अनेक जण या खास गिफ्टची प्रशंसा करतानासुद्धा कमेंटमध्ये दिसून आले आहेत