Wild Boar Cub Chases Cheetahs: जंगलातल्या सफारीदरम्यान पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं एक दृश्य सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. चित्त्यासारख्या वेगवान आणि भयंकर शिकाऱ्यासमोर जेव्हा एक छोटा डुक्कर समोर आला, तेव्हा क्षणभर सगळ्यांना वाटलं आता तर याचा शेवट ठरलेला. पण, पुढच्याच क्षणी घडलं असं काही की, पाहणारे थक्क होऊन गेले. संभाव्य शिकार ठरू शकणारा तो छोटा जीव अंगावर धावून येताना दिसयोय आणि शिकार करण्च्या पवित्र्यात असलेल्या त्या तीन चित्त्यांची पावलं हादरू लागलीत… पुढे काय झालं? तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही श्वास रोखावा लागेल.

जंगल म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर भीती, थरार आणि जीवघेणी झुंज उभी राहते. साधारणपणे लहान डुकरे ही जंगलातील भक्षक प्राण्यांच्या हाती सहज शिकार ठरतात. पण, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या एका भन्नाट व्हिडीओनं ही समजूतच पूर्ण बदलून टाकली आहे. कारण- एका लहानशा डुकरानं तीन-तीन चित्त्यांना अशी झुंज दिली की, पाहणारेही चकित होऊन गेले.

हा थरारक व्हिडीओ एका पर्यटकाने जंगल सफारीदरम्यान टिपला असून, इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही तासांत लाखोंच्या संख्येने व्ह्युज मिळाले आहेत.

काय दिसलं व्हिडीओत?

व्हिडीओच्या सुरुवातीला तीन चित्ते एका लहान डुकराला एकटं पाहून शिकार करण्यासाठी दबा धरतात. क्षणभर वाटतं की, डुकराचं आयुष्य आता संपलंच. पण, पुढच्याच क्षणी दृश्य पूर्ण बदलून जातं. लहान डुकरानं पळ काढण्याऐवजी धाडसी पवित्रा घेत चित्त्यांवरच चढाई केली.

“मी शिकार नाही; मीच शिकारी आहे!” असा संदेशच जणू त्यानं आपल्या प्रतिडावातून दिला. डुकराच्या आक्रमकतेसमोर ते तीनही चित्ते गडबडून मागे हटले. त्यानंतर सुरू झालं दंगलमय दृश्य आणि मग त्या लहानखुऱ्या वाटणाऱ्या डुकरानं तीन चित्त्यांना अक्षरशः पळवून लावलं.

थक्क करणारं धाडस

सामान्यतः चित्त्यासारखा वेगवान शिकारी डुकरासारख्या प्राण्याला सहजपणे नामोहरम करताना दिसतो; पण इथे सगळंच उलट झालं. डुकराच्या निर्भीड हल्ल्यामुळे चित्त्यांचीच अवस्था केविलवाणी झाली आणि ते जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. पाहणाऱ्यांना डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं ते दृश्य होतं.

जरी या व्हिडीओत शेवटपर्यंत डुक्कर वाचलं की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. तरी त्यानं दाखवलेलं धैर्य आणि लढाऊ वृत्ती खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

@latestkruger या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि १२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. युजर्स प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत. “तीन चित्त्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे”, “हा लहान डुक्कर म्हणजे खराखुरा बॉस ठरला!”

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून एक गोष्ट मात्र ठाम पटते की, धैर्य मोठं असलं तर शत्रू कितीही बलाढ्य का असेना, त्याला पराभूत करणं शक्य असतं.