जेवणात केस सापडला म्हणून एका नवऱ्याने आपल्या पत्नीचे केस कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्याशा कारणावरुन पत्नीचे बळजबरीने टक्कल करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे घडली आहे. पत्नीने बनवलेल्या जेवणामध्ये केस सापडल्यामुळे पतीला एवढा राग आला की त्याने आपल्या पत्नीचे बळजबरीने केस कापले. आश्चर्याची बाब म्हणजे तो त्याच्या पत्नीचे केस कापण्यासाठी पतीच्या कुटुंबीयांनी त्याला साथ दिली. या घटनेनंतर पीडीत महिलेने पतीसह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा- सावधान! सोशल मीडियाद्वारे ओळख नंतर भावनिक ब्लॅकमेलिंग, एकाच आरोपीकडून १५५ महिलांची फसवणूक
गजरौला पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित ३० वर्षीय महिलेने सांगितले की, तिचा नवरा जेवत असताना त्याच्या जेवणामध्ये केस सापडला आणि एवढ्याशा कारणावरुन तो भयंकर संतापला. त्याने तोंडात कापडाचा बोळा घातला, हात-पाय बांधले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, जबरदस्ती संबंध करण्याला विरोध करताच नवऱ्याने माझे सर्व केस कापल्याचं महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे.
नवरा त्रास देत असताना घरात उपस्थित असणाऱ्या सासू आणि दिराने नवऱ्यालाच साथ दिली असल्याचंही महिलेने सांगितलं. शिवाय या सर्व प्रकरणानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय सासरी आले असता त्यांनाही सासरच्या लोकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं महिलेने सांगितलं.
मुलाला सोडून निघून जा –
दरम्यान, ‘नवरा आपल्याकडे हुंड्याची मागणी करतो, हुंडा द्यायचा नसेल तर मुलगा येथे ठेवून तु निघून जा’ असं नवरा म्हणत असल्याचंही पीडितेने सांगितलं. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पतीसह तीघांवर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिला तिच्या माहेरी निघून गेली असल्याची माहिती मिलाली आहे.