Shocking Video: भटक्या जनावरांमुळे लोकांचे दैनंदिन जीवन धोक्यात आलं आहे. गल्लीत खेळणारी मुलं, घराबाहेर उभे असलेले ज्येष्ठ नागरिक आणि रोजचं कामं करणाऱ्या महिलांमध्ये सातत्यानं भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना न केल्या गेल्यानं नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. अशातच नुकत्याच घडलेल्या एका भयावह प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यानं लोकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांना नवीन वळण दिलं आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे काही दिवसांपासून एका भटक्या बैलानं भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. मुझफ्फरनगर नॉर्दर्न रामपुरी भागात ३० सप्टेंबर रोजी सुभाष नावाचे स्थानिक रहिवासी आपल्या घरासमोर उभे असताना अचानक भटका बैल त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर तो वेगानं व्हायरल होतोय.

व्हिडीओत बैल वेगानं धावत येतो आणि वृद्ध सुभाष यांना शिंगांनी उचलून थेट नाल्यात फेकून देतो. त्यानंतरही बैल त्यांच्यावर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्या माणसाचे डोकं आणि छाती यांना झालेल्या दुखापतींमुळे ते गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून येत आहे. ते तडफडत असताना घरातील लोक आणि शेजारी धावत येतात. काही जण काठ्या आणि लाकडी दांड्यांनी बैलाला दूर लोटतात. त्यानंतर सुभाष यांना नाल्यातून बाहेर काढून उपचारासाठी नेण्यात येतं. स्थानिकांच्या मते, हा बैल चार दिवसांपूर्वी कॉलनीत घुसला आहे आणि त्या कारणामुळे तेव्हापासून मुलांनादेखील घराबाहेर खेळू दिले जात नाही आहे. एका व्यक्तीवर आधीच हल्ला झाल्यानं वातावरणात तणाव आहे.

स्थानिकांमध्ये उद्रेक, तणाव व सुरक्षेसंबंधीची चिंता वाढत असून, या घटनेनं प्रशासनालादेखील जागं केलं आहे. परिसरातील रहिवाशांच्या मते, या बैलामुळे मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिला घराबाहेर जाणं टाळत आहेत. सोशल मीडियावर पसरलेल्या एका व्हिडीओमुळे संपूर्ण घटनेचं गांभीर्य अधिक स्पष्ट होतं.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी नगरपालिका आणि पोलिस यांच्यावर प्रलंबित कार्यवाहीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “एवढ्या मोठ्या भागात एक बैल चार दिवस हिंडतोय आणि कोणी त्याला पकडतही नाही?”, “नाल्यात फेकलेला माणूस वाचला हीच मोठी गोष्ट!”, “बैलाला त्वरित गोशाळेत हलवा”, परिसरातील मुलांसाठी परिस्थिती सुरक्षित नाही”, अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या आहेत. काहींनी स्थानिक पातळीवर जनावरांसाठी स्वतंत्र आश्रयस्थानांची मागणी केली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने घटना लक्षात घेतली असून, संबंधित बैलाला शोधून पकडण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आहे. पकडल्यानंतर त्याला गोशाळेत हलवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.