Cancer Patient Dancing Video: जगण्याचा नेमका क्षण कोणता, हे कोणालाच सांगता येत नाही. काही वेळा जीवन इतकं अनिश्चित वळण घेतं की, सगळं काही हातातून निसटतं. शरीर साथ सोडतं, मन खचतं आणि काही वेळा तर जगण्याची इच्छाही मंदावते. पण, अशा अंधारातसुद्धा काही लोक आपल्या प्रकाशानं सगळ्यांच्या मनात आशेचा किरण पेरतात.
अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे त्रिझा या तरुणीची. कॅन्सरसारख्या भयंकर आजारानं तिच्या शरीरावर आघात केला; पण तिच्या मनोबलावर तो हल्ला करू शकला नाही. उपचारांच्या कठीण टप्प्यातसुद्धा त्रिझानं आपल्या हास्य आणि उत्साहानं सर्वांना चकित केलं आहे.
अलीकडेच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्रिझा आणि तिचे डॉक्टर मिळून १९५९ सालच्या ‘बरखा’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘तडपाओगे तडपा लो’ या गाण्यावर नाचताना दिसतात. तिच्या चेहऱ्यावर आजाराचा थकवा नाही, तर एक अविश्रांत ऊर्जा आणि आनंद झळकत आहे. रुग्णालयाच्या खोलीत चाललेला नृत्याचा ताल… औषधांच्या वासात मिसळलेलं स्मित… आणि त्या स्मितातून झळकणारी आशा ही आहे त्रिशाची कथा, जी आज जगाला शिकवते आहे, ‘आजार शरीराला होतो; पण जिंकायचं मनातूनच.”
व्हिडीओ पाहून असं वाटतं “कॅन्सर शरीरावर वार करू शकतो; पण आत्म्यावर नाही.” हे वाक्य त्रिझाच्या प्रत्येक हालचालीतून, तिच्या प्रत्येक स्मितातून जाणवतं. तिनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करीत लिहिलं आहे “कॅन्सर माझ्या शरीराची परीक्षा घेऊ शकतो; पण तो माझ्या आत्म्याला कधीच हरवू शकणार नाही. प्रत्येक स्मितासोबत मी आशा, प्रेम व जीवनाची निवड करीत आहे.”
हा व्हिडीओ आतापर्यंत दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. नेटिझन्सनी तिच्या धैर्याला सलाम केला आहे. एका युजरनं लिहिलं, “बहीण, काळजी करू नकोस. तू नक्की बरी होशील. तुझं हसणं हेच तुझं बळ आहे.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “देव तुझं रक्षण करो. मजबूत राहा आणि हे सुंदर स्मित कधीच हरवू देऊ नको.”
त्रिझा प्रत्येक पोस्टमधून दाखवते, “उपचार, वेदना व भीती यांच्यामध्येही माणूस जगण्याची इच्छा सोडत नाही.” ती आपल्या भावना व अनुभवांमधून आणि प्रत्येक दिवसातील संघर्षातून जगाला सांगते, “आजार कितीही मोठा असो; मनातली आशा जर जिवंत असेल, तर जीवन नेहमी जिंकतंच.”
येथे पाहा व्हिडीओ
कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढा देतानाही आपल्या आनंदी स्वभावानं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी त्रिशा आज चर्चेत आहे. तिचा ‘तडपाओगे तडपा लो’ गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल होत असून, तिचं मनोबल सगळ्यांना प्रेरणा देतंय.