Viral Post Man With 14 Years Of Banking Experience Ends Up On Footpath : शिक्षणादरम्यान आपल्या सगळ्यांनाच एखादे क्षेत्र किंवा एखादी कंपनी आवडत असते, जिथे काम करण्याचे आपले स्वप्न असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण त्या कंपनीत, त्या क्षेत्रात जॉब मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण, सध्याच्या काळात नोकरी शोधणे सोपे काम नाही. अशातच नोकरी मिळाली तरीही ती टिकवून ठेवण्यासाठीही तितकेच प्रयत्न करावे लागतात. तर सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे, जी वाचून तुमच्याही डोळ्यांत नक्की पाणी येईल.
reddit युजरला बंगळुरूच्या एका सिग्नलला रस्त्याकडेला बसलेला एक माणूस दिसला. त्याला पाहून त्याला एकच प्रश्न पडला की, हे समाजाच्या अपयशाचे परिणाम आहेत की वैयक्तिक निवडींचे? कारण काय, तर त्या माणसाच्या हातात क्यूआर कोडचा कागद आणि त्यावर कन्नड आणि इंग्रजी अक्षरात लिहिलेली ती अक्षरे. १४ वर्षे बँकिंगच्या कामाचा अनुभव असूनही त्या माणसाकडे नोकरीच नव्हती. नोकरी गेल्यामुळे हक्काचे राहायचे घरसुद्धा नव्हते, त्यामुळे मदतीसाठी त्याने शेवटचा पर्याय हा निवडला.
तो त्याचा वैयक्तिक प्रश्न… (Viral Post)
इतरांकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्याने क्यूआर कोड असलेला एक कागद हातात धरला आहे आणि “माझ्याकडे नोकरी नाही, घर नाही, कृपया मला मदत करा. पण, मला बँकिंगमध्ये १४ वर्षांचा कामाचा अनुभव आहे”; असे कागदावर आवर्जून लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टने लक्ष वेधून घेतले आणि वर्षानुवर्षे अनुभव असूनही भारतात बेरोजगारीबद्दलचा प्रश्न पुन्हा एकदा सुरू झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर ही पोस्ट reddit च्या @Being-Brilliant या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पण, नेटकरी ही पोस्ट पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही जणांनी व्यक्तीवर आर्थिक व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीका केली, तर काही जणांनी “तुमच्याकडे त्याची अधिक माहिती असेल तर ती शेअर करा.” “लोक त्याला मदत करू शकतात आणि त्याच्या सीव्हीच्या आधारे त्याची शिफारस करू शकतात, कारण त्याला १४ वर्षांचा बँकिंग अनुभव आहे”, “असा बँकर ज्याने १४ वर्षांचा अनुभव असूनही त्याच्या वैयक्तिक आर्थिक बाबींचे (सेव्हिंग्स) योग्य नियोजन केलेले नाही”, “काहीही असो, ते दुर्दैवी आहे; पण जर तो फक्त काम करण्यास किंवा काम शोधण्यास तयार नसला तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.