Pune Restaurant’s Menu Went Viral : अन्नाची नासाडी म्हणजे फक्त अन्न वाया घालवणे नव्हे, तर धान्य, फळ-भाज्या पिकवण्यासाठी लागलेली मजुरी, श्रम, गुंतवणूक आणि स्रोतांचे आपण केलेले नुकसान आणि अपमान असतो. त्यामुळे अगदी घरी जेवताना असो किंवा एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर किंवा अगदी हॉटेलमध्ये जेवतानासुद्धा आपण अन्न वाया जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. पण, कितीही आपण ठरवले तरीही अनेक जण अन्न वाया घालवताना दिसतात. तर हेच लक्षात घेता, एका हॉटेलने जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.
पुण्यातील एका रेस्टॉरंटच्या मेन्यूचा फोटो सध्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. एक ग्राहक पुण्याच्या या रेस्टॉरंटमध्ये खायला गेला होता. यादरम्यान रेस्टॉरंटमध्ये लावलेल्या मेनू बोर्डकडे त्याचे लक्ष गेले. तिथे विविध खाद्यपदार्थांची यादी लावली तर होती. पण, या सगळ्या मेन्यूमध्ये लक्ष वेधून घेणारी तळाशी लिहिलेली एक ओळ ठरली. ज्यामध्ये “अन्न वाया घालवल्याबद्दल तुम्हाला २० रुपये जास्तीचे द्यावे लागतील”, असे लिहिण्यात आले होते.
२० रुपये खूप कमी आहेत (Viral Post)
एखादा पदार्थ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे अन्न पिकवण्यासाठी कष्ट, त्यानंतर बाजारातून विकत आणून जेवण बनवणाऱ्यांचे कष्टाला आपण नाकारून चालणार नाही. साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या रोनिता या ग्राहकाने या मेन्यू बोर्डचा फोटो काढला आणि ‘पुण्यातील एक हॉटेल अन्न वाया घालवल्यास २० रुपये जास्त आकारत आहे. प्रत्येक रेस्टॉरंटनेही असेच करावे, लग्न आणि समारंभांमध्येही दंड आकारण्यास सुरुवात करावी’, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. एकदा बघाच ही व्हायरल पोस्ट…
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट @rons1212 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून एक युजर म्हणतोय, “अन्न फेकून देणाऱ्यासाठी शुल्क आकारणे ही हुशारी आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही आणि सगळे अन्न पूर्ण खाण्याची जबाबदारीसुद्धा आपल्या अंगावर राहते. लग्न किंवा कार्यक्रमांपर्यंत अशा पद्धतीचे नियम अन्नाच्या कचऱ्याच्या मोठ्या संकटाला आळा बसवू शकतात. बंदीपेक्षा वर्तणुकीशी संबंधित अशा सूचना अधिक चांगल्या प्रकारे काम करतात”, तर दुसरा युजर म्हणतोय, ” मला वाटते की २० रुपये खूप कमी आहेत आणि अन्नाच्या किमतीवर आधारित दंड असले पाहिजेत. कारण – लोक बुफे जेवणात खूप अन्न वाया घालवतात” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.