TC Sending Instagram Request After Recent Train Journey : प्रवासादरम्यान प्रवाशांना दररोज काय काय सहन करावे लागते यांचा अंदाज करणे कठीण आहे. ट्रेनमधील अस्वच्छ बाथरूम आणि बसण्याची जागा, फेरीवाल्यांद्वारे विकले जाणारे धोकादायक खाद्यपदार्थ, चोरी होणारे सामान, त्रासदायक प्रवासी आदी सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला त्रास होतो. पण, आज अशी एक गोष्ट व्हायरल होत आहे, ज्यामुळे कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि नेमका सुरक्षित प्रवास करायचा कसा असा प्रश्न तुम्हाला पडेल.

एका Reddit युजरने प्रवासादरम्यानचा तिचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे, ज्याचा कदाचित कधीच कोणी विचार केला नसेल. ट्रेनने प्रवास करीत असताना नेहमीप्रमाणे प्रवाशांची तिकिटे तपासण्यासाठी टीटीई आला. टीटीईने तिकीट तपासल्यानंतर लगेचच तिला इन्स्टाग्रामवर एक फॉलो रिक्वेस्ट आली. तिने ही रिक्वेस्ट त्याच टीटीईकडून आल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे तिने अंदाज केला की, तिचे नाव आरक्षण चार्टवरून घेतले गेले असावे. त्यामुळे ही घटना अत्यंत भयानक असल्याचे तिने म्हटले आहे.

तुम्ही या गोष्टीची तक्रार केली पाहिजे (Viral Post)

ही घटना घडल्यानंतर Reddit युजरने पोस्ट शेअर केली आणि प्रवासी नाव, मोबाईल नंबर किंवा आणखीन खासगी माहिती फक्त प्रवासासाठीच देतात. त्यामुळे इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट आल्यानंतर तिला थोडे अस्वस्थ वाटले. त्याचबरोबर तिने इतरांनाही असेच अनुभव आले आहेत का आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये असे वर्तन सामान्य आहे का, असा सवालदेखील केला आहे. त्याचबरोबर तिने तारीख किंवा टीसीची ओळख याबद्दलची माहिती अद्याप उघडपणे सांगितलेली नाही आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला प्रदान केलेल्या वैयक्तिक माहितीचा संभाव्य गैरवापर केला जातो आहे का याबद्दल ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट Reddit अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. युजर्सनादेखील ही पोस्ट बघून धक्का बसला आहे आणि “प्लीज रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. अत्यंत धक्कादायक वर्तन आहे. जर तुम्ही रिक्वेस्ट स्वीकारली, तर तुम्हाला भरपूर मेसेज येतील”, “प्रत्येक दिवशी प्रवाशांना काहीतरी वेगळा अनुभव येतो”, “तुम्ही या गोष्टीची तक्रार केली पाहिजे”, “महिला नेमक्या कुठे सुरक्षित आहेत?” आदी अनेक कमेंट्स नेटकरी पोस्टखाली करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.