Noida Cab Driver Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. थेट रस्त्यावर कॅब चालकाने चार-पाच तरुणींवर संताप व्यक्त करत शिवीगाळ केली, त्यांना गाडीतून बाहेर ढकलले आणि हातात लोखंडी रॉड घेऊन जीव घेण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ मुलींनी चतुराईने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून, तो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नोएडातील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

त्याचप्रमाणे तक्रारदार युवतीचं नाव सपना गुप्ता असून तिनं आपल्या मैत्रिणी जॅस्मिन, रिया, वैष्णवी आणि वंशिकासोबत २३ सप्टेंबर रोजी कॅब बुक केली होती. पाचही मैत्रिणी बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनहून सेक्टर-१२८ येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं. चालकाचं नाव ब्रिजेश असल्याचं समजतं. मात्र, रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं आणि मुलींनी पर्यायी रस्ता घेण्याची विनंती केली, तेव्हाच त्याचा पारा चढला.

मुलींच्या म्हणण्यानुसार, चालक अचानक आक्रमक झाला आणि त्याने मुलींना चिडून शिव्या देण्यास सुरुवात केली. त्याचा संताप एवढा वाढला की प्रवासी असतानाच त्याने त्यांच्यावर आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या वागणुकीमुळे घाबरलेल्या मुलींनी गाडी थांबवण्यास सांगितले आणि पुढे प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पैसे देण्याचा प्रश्न आला तेव्हा मुलींनी नकार दिला. याच क्षणी चालकाने मुलींना जबरदस्ती गाडीतून बाहेर ढकलले आणि कारच्या डिकीतून लोखंडी रॉड बाहेर काढला. तो रॉड हातात घेऊन मुलींच्या दिशेने धावू लागला आणि शिवीगाळ करत त्यांचा जीव घेण्याची धमकी दिली.

पाहा व्हिडिओ

संपूर्ण प्रसंगात जॅस्मिन नावाच्या मुलीने शांत राहून मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडीओमध्ये चालकाच्या हातातला रॉड आणि त्याने केलेला दंगा स्पष्टपणे दिसत आहे. मुलींनी कसेबसे तिथून स्वतःला वाचवले आणि थेट सेक्टर-३९ पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं की, सपना गुप्ता हिने लेखी तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून लवकरच त्याला पकडले जाईल.

दरम्यान, व्हिडीओ सोशल मीडियावर पोहोचताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका तरुणीने धैर्य दाखवत व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. नेटिझन्सनी पोलिसांनी त्वरीत कारवाई करून महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. नोएडासारख्या प्रगत आणि वर्दळीच्या शहरात महिलांवर खुलेआम अशा प्रकारे दहशत निर्माण केली जाणं चिंताजनक असल्याचं सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे अशा घटना वारंवार घडत असून, कॅब सेवा वापरणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.