Viral Video Shows Human Animal Bond : बाळाला जन्म देताना आईचा नव्याने जन्म होतो असे म्हणतात. बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, तिच्या शरीरात किती बदल होतात ; याबद्दल फक्त आणि फक्त तीच व्यक्त होऊ शकते. पण, यादरम्यान आपण तिची भावनिक आधार देऊन मदत करू शकतो. मग ती एका बाळाची आई असो किंवा एखाद्या जंगलात राहणाऱ्या प्राण्याची आई… तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले; जेव्हा प्राण्याला नवजात पिल्लाला जन्म देताना पाहून ट्रेन चालकाने केलेल्या कृतीचे कौतुक होत आहे…
व्हायरल व्हिडीओ झारखंडमधील आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. एका जंगलात रेल्वे रुळांवर हत्तीण तिच्या पिल्लाला जन्म देत होती. ट्रेन चालकाने हे पहिले आणि हत्तीण आणि तिच्या पिल्लाच्या सुरक्षेसाठी ट्रेन थांबवली. फक्त ट्रेन थांबवलीच नाही तर जवळजवळ दोन तास वाट पाहिली. पिल्लू सुखरूप बाहेर आल्यानंतर आई आणि बाळ हळूहळू चालत जंगलात पायी निघून गेले. त्यानंतर ट्रेन चालक आपल्या दिशेने निघाला.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी हा क्षण पाहून “मानव आणि प्राणी यांच्यात होणाऱ्या संघर्षांच्या बातम्यांव्यतिरिक्त, मानव-प्राणी यांच्यातील नाते कसे असते हे उदाहरण शेअर करताना आनंद होत आहे. प्रयत्नांचे असे हृदयस्पर्शी निकाल पाहणे खूप छान वाटते . झारखंडच्या वन अधिकाऱ्यांना त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल विशेष कौतुक, ज्यामुळे हत्तीणीला तिच्या पिल्लाला जन्म देण्यास मदत झाली” ; अशी त्यांनी सुंदर कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. एकदा पाहाच हा सुंदर क्षण…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अधिकृत @byadavbjp या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (@MOEFCC) आणि रेल्वे मंत्रालय (@RailMinIndia) यांनी मिळून देशभरातील सुमारे ३,५०० किमी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण केले आहे आणि त्यामधून ११० पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणांची ओळख पटवली आहे. अशा प्रयत्नांमुळे निसर्ग आणि प्राण्यांचे रक्षण करण्याच्या दिशेने सकारात्मक आणि सुखद परिणाम दिसत आहेत.