Father & Daughter Emotional Video: बाप आणि मुलगी यांचं नातं हे सर्व नात्यांमधलं सर्वात सुंदर आणि निःस्वार्थ नात्यांपैकी एक मानलं जातं. मुलगी म्हणजे बापाच्या डोळ्यातलं पाणी आणि हृदयाची धडधड असते. तिच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्यासाठी, तिच्या आयुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी वडील कोणतीही पर्वा न करता झगडत असतात. असाच एक प्रसंग नुकताच रेल्वे ट्रॅकवर घडला आणि तो पाहून जगभरातील लोकांनी या वडिलांना सलाम केला आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर bharat24liv नावाच्या युजरने पोस्ट केला असून तो काही वेळातच व्हायरल झाला आहे. या थरारक व्हिडीओमध्ये दिसतं की, एक छोटीशी चिमुकली चुकून रेल्वेच्या पटरीवर घसरते. त्या क्षणी जोरात येणारी रेल्वे दूर नसते. अशा वेळी बापाने जो निर्णय घेतला तो खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारा होता. यावेळी वडील धावतच रुळांवर जातात आणि आपल्या मुलीला छातीशी कवटाळतात. रेल्वे जवळ येते आणि बाप स्वतः रुळांवर पडून मुलीला आपल्या जवळ घेतात. संपूर्ण रेल्वे त्यांच्यावरून जाते, पण बापाच्या या धाडसामुळे चिमुकली सुखरूप वाचते.

हा प्रसंग पाहून थरकाप उडालेला असतो. मात्र, रेल्वे गेल्यानंतर जेव्हा वडील आपल्या मुलीला सुरक्षित उचलून बाहेर काढतात, तेव्हा सर्वांच्याच डोळ्यात पाणी येतं. बापाने आपल्या जीवाची पर्वा न करता, फक्त लेकीच्या सुरक्षेसाठी स्वतःला ‘ढाल’ बनवलं.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिला आहे. २७ हजारांहून अधिक युजर्सनी या पोस्टला पसंती दिली असून हजारो लोकांनी कमेंट करून वडिलांच्या शौर्याला सलाम केला आहे. एका युजरने लिहिलं, “पिता कसा असतो? तो असा असतो.” तर दुसऱ्याने म्हटलं, “घर म्हणजे मंदिर आणि आई-वडील म्हणजे देव. असं धाडस दाखवून हे वडील खरंच देवापेक्षा मोठे ठरले आहेत.”

काही युजर्सनी मात्र दुःख व्यक्त करताना असही सांगितलं की, “आजकालची पिढी आई-वडिलांना विसरून जात आहे, पण हे उदाहरण दाखवून देतं की वडील आपल्या मुलीसाठी कधीच मागे हटत नाहीत.” सध्या इंटरनेटवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वत्र फक्त एकच आवाज घुमतो आहे – हे असतात खरे वडील.