सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील एका भारतीय कामगाराने सौदी अरेबियात अडकल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओमुळे लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भारतीय दूतावासालाही याची दखल घ्यावी लागली आहे. परंतु, या घटनेबाबत सौदी सुरक्षा विभागाने सर्व दावे फेटाळून लावत “हा व्हिडीओ फक्त सोशल मीडियावर व्ह्युज वाढवण्यासाठी बनवला गेला आहे,” असा खुलासा केला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील हांडिया गावातील असल्याचा दावा करणारा एक तरुण सौदी अरेबियाच्या वाळवंटात उंटासह दिसत आहे. त्याचा चेहरा स्पष्टपणे घाबरलेला आणि निराश दिसत आहे. तो मराठी नसून भोजपुरी भाषेत बोलताना म्हणतो की, त्याला जबरदस्तीने तिथे थांबवण्यात आले आहे आणि त्याचा नियोक्ता त्याला धमक्या देत आहे.
त्या युवकाने भावनिक अपील करीत, “जर तुम्ही हिंदू असाल, मुस्लीम असाल, भाऊ असाल किंवा बहीण असाल, तुम्ही कोण आहात. कृपया मला मदत करा, कृपया, मी मरेन, मला माझ्या आईकडे जायचे आहे”, असे आवाहन केले.
म्हणजेच धर्म कुठलाही असो, जो कोणी हे पाहत आहे त्याने त्याला मदत करावी; अन्यथा तो मरून जाईल, असे तो म्हणतो. त्याचबरोबर तो लोकांना विनंती करतो की, हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल. तो म्हणतो की, त्याचा पासपोर्ट त्याच्या मालकाने ‘कपिल’ नावाच्या माणसाने जप्त केला आहे, ज्याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पाहा व्हिडिओ
या घटनेवर सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने तत्काळ प्रतिसाद दिला. ‘कल्पना श्रीवास्तव’ नावाच्या एका ट्विटर वापरकर्तीने हा व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या उत्तरात, दूतावासाने म्हटले की, दूतावास त्या व्यक्तीच्या ठावठिकाण्याची चौकशी करीत आहे. तथापि, व्हिडीओमध्ये त्याचे स्थान, प्रांत किंवा संपर्क क्रमांक दिलेला नसल्याने पुढील कारवाई शक्य नाही. दूतावासाने व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती मिळविण्याची विनंती केली आहे.
दुसरीकडे सौदी सुरक्षा विभागाने या व्हिडीओतील सर्व दावे फेटाळले आहेत. त्यांनी ट्विटर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करीत लिहिले की, त्या व्यक्तीने केलेला दावा निराधार आहे. हा व्हिडीओ फक्त त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्ह्युज वाढवण्यासाठी बनवला गेला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारची कैद, अत्याचार किंवा धमकीची घटना घडलेली नाही.
या व्हिडीओवर सोशल मीडियावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती व्यक्त करीत त्याला मदत करण्याची मागणी केली, तर काहींनी त्याचा दावा संशयास्पद असल्याचे म्हटले. अनेक वापरकर्त्यांनी दूतावासाला टॅग करून त्वरित चौकशी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, काहींनी सौदी प्रशासनाच्या विधानावर विश्वास दाखवला, तर काहींनी “जर व्हिडीओ बनावट असेल, तर तो इतका घाबरलेला का दिसतो,” असा प्रश्न उपस्थित केला.
