Kids Become Class Monitor Viral Video : शाळेत मॉनिटर होणे म्हणजे स्वर्गसुख. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यापासून ते अगदी शिक्षकांना मदत करण्यापर्यंत हा मॉनिटर सगळ्यांसाठी एका हाकेवर हजर राहतो. त्यामुळे अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंत एकदा तरी वर्गाचा मॉनिटर होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये आज एक विद्यार्थी शाळेत मॉनिटर बनला आहे आणि हा आनंद त्याने घरी येऊन कुटुंबाबरोबरही शेअर केला आहे; जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

तुम्ही वर्गात शांत, नीटनेटके राहात असाल किंवा गृहपाठ व्यवस्थित करून आणत असाल, तर तुम्ही लगेचच शिक्षकांचे आवडते होऊन जाता. तुमची शिस्त, तुमचा नीटनेटकेपणा इतर विद्यार्थ्यांमध्ये यावा म्हणून मग हे शिक्षक तुम्हाला मॉनिटरसुद्धा बनवतात. तर आज व्हायरल व्हिडीओत मुलगा शाळेतून घरी येतो. घरी येताच तो शर्टावर लावलेला बॅज आईला दाखवतो. बॅजवर ‘क्लास मॉनिटर’, असे लिहिलेले असते. ‘मी क्लास मॉनिटर झालो’, असे सांगत तो जोरजोरात उड्या मारताना दिसत आहे.

तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर नको लागुदेत (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, अभ्यास किंवा नोट्स बनविण्यामुळे नाही, तर त्या विद्यार्थ्याची शिस्त पाहून, त्याला मॉनिटरचा बॅज देण्यात आला आहे, असे लेक अगदी अभिमानाने आईला व्हिडीओत सांगताना दिसत आहे. त्यावर त्याचे वडील अगदी मजेशीर विनोद करतात आणि हसून म्हणतात, “तू वर्गाचा मॉनिटर असशील; पण मी घराचा सीपीयू आहे.” मुलाची आईदेखील त्याला, “बापरे! तू आणि शिस्त” असे म्हणून हसायला लागते आणि लेकाचे तोंडभरून कौतुक करते आणि हा खास क्षण व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर शेअर करते .

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bgbasheer आणि @ricksterzz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून शाळेच्या आठवणींत रमून गेले आहेत आणि “तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर नको लागू देत”, “मला सीपीयूचा जोक कळायला ३० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला”, “शाळेत शांत आणि घरी मस्तीखोर”, “शाळेतील शिक्षिकांनी हा व्हिडीओ बघितला पाहिजे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.