दिल्लीच्या मेट्रो स्थानकावरचा एक भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओने केवळ लोकांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर त्यांच्या मनालाही स्पर्श केला आहे. दररोजच्या धावपळीच्या जीवनात जिथे लोकांना एकमेकांसाठी वेळ नसतो, तिथे एका प्रवाशाने दाखवलेला दयाळूपणा आणि माणुसकीची झलक सध्या इंटरनेटवर कौतुकाचा विषय ठरली आहे.

हा व्हिडीओ दिल्लीतील एका मेट्रो स्थानकावरचा आहे, जिथे एक दिव्यांग महिला आपल्या हातात गुलाब घेऊन प्रवाशांना विक्री करताना दिसते. ही महिला क्रचच्या आधाराने उभी राहून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गुलाब विकते. तिच्या आयुष्यात खूप संघर्ष आहे, पण ती हार न मानता मेहनत करते.

व्हिडीओत दिसते की, एक प्रवासी स्थानकाच्या बाहेर येतो आणि त्या महिलेपाशी जाऊन काही गुलाब विकत घेतो. तो तिला पैसे देतो, पण काही क्षणांनंतरच तो हसत म्हणतो – “ही फुलं तुमच्यासाठीच आहेत.” सुरुवातीला ती महिला थोडी चकित होते, परंतु लगेचच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक उमटते. तिच्या डोळ्यातील चमक आणि ओठांवर उमटलेले हास्य पाहून प्रत्येक प्रेक्षकाचे हृदय वितळते. या छोट्याशा क्षणात दयाळूपणा, सन्मान आणि माणुसकीचे सुंदर दर्शन घडते.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओवर सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या कृतीचं मनापासून कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, “अरे वा! अजूनही या जगात माणुसकी जिवंत आहे. या व्हिडीओमुळे दिवस अधिक सुंदर झाला.” दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “अशा गोष्टी पाहून मनाला शांती मिळते, इतक्या नकारात्मकतेच्या जगात अशा क्षणांनी आशेचा किरण दाखवला.

तर काहींनी या घटनेवर समाजातील वास्तवावर भाष्य करत म्हटलं की, “अनेक ठिकाणी भीक मागण्याचं वेगवेगळं रूप दिसतं, पण तरीही या व्हिडीओतील माणुसकी नक्कीच प्रेरणादायी आहे.” हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून लाखो जणांनी त्याला पसंती दिली आहे. या एका छोट्या कृतीतून मानवतेचा मोठा संदेश दिला गेला आहे — दयाळूपणा कधीच लहान नसतो, तो नेहमीच कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणतो.