Viral Video Lady Passenger Thrashes Uber Driver : कॅबचा प्रवास आरामदायक, सोयीस्कर असला तरीही दुसरीकडे चुकीच्या पत्त्यावर पोहचवणे, राईड मध्येच कॅन्सल करणे, असुरक्षित वातावरण निर्माण करणे आदी बऱ्याच गोष्टींमुळे प्रवासी चालकाबरोबर भांडताना दिसतात. पण, काही जण असे असतात; जे विनाकारण भांडण करतात आणि कॅब चालकाचे नाव पुढे करून मोकळे होतात. आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये कॅब चालकाची काहीही चूक नसताना प्रवासी महिला त्याच्यावर रागावातना दिसते आहे.

व्हायरल व्हिडीओत महिला प्रवाशाने उबर बूक केलेली असते. यादरम्यान कॅब चालकाची गाडी रस्त्यात बिघडते. त्यामुळे त्याला गाडी थांबवून प्रवास (राईड) रद्द करावा लागतो. पण, महिला प्रवाशाला चुकीचा संशय येतो की, या ड्रायव्हरने काहीतरी घोटाळा केला आहे. कारण – तिने राईड सुरु होण्याआधीच ॲपद्वारे थेट उबरला पैसे (भाडे) भरले होते. भाडे भरल्यामुळे महिला प्रवासी परतफेड मागायला लागली. पण, ड्रायव्हरला लगेच पैसे मिळत नसल्यामुळे त्याने परतफेड करण्यास नकार दिला. त्याने तिला नम्रपणे असेही सांगितले की, प्रवासाचे पैसे परत हवे असतील तर उबरवर तक्रार नोंदवावी. ॲपद्वारे थेट परतफेड मिळेल.

शिवीगाळी करत मारण्याची दिली धमकी (Viral Video)

पण, संतप्त झालेल्या महिलेने दुसरा मार्ग निवडला. तिने आरडाओरडा, ड्रायव्हरला धमकी देण्यास सुरुवात केली. मग महिलेचे अयोग्य वर्तन पाहून कॅब चालक “तुमच्याविरोधात तक्रार दाखल करेन, तुम्ही गाडीतून खाली उतरा” असे म्हणतो. हे ऐकून संतप्त महिला कॅब चालकावरच गैरवर्तन केल्याचा आरोप करते आणि “माझं तोंड आहे मी काहीपण बोलेन. मी गाडीतून उतरणार नाही; तुझी लायकी असेल तर गाडीतून उतरवून दाखव. चप्पल काढेन आणि तोंडावर मारेन. सगळ्या माणसांना गोळा करेन आणि तुला मारायला सांगेन; जर माझ्याशी गैरवर्तवणूक केलीस तर” ; असे म्हणत महिला प्रवासी सीटवर दोन ते तीन वेळा हात आपटते.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या @DeepikaBhardwaj एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “ह्यांच्या घरातील लोक अशा महिलांना कसे सहन करतात? देवाचे आभार, ड्रायव्हरने हे रेकॉर्ड केले. नाही तर तिने १५० रुपयांपेक्षा जास्त भाडे कॅब चालकांकडून घेतले असते” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. पण, नेटकरी व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

एक युजर म्हणतोय “त्या महिलेला एका अगदी योग्य मुद्द्यावर राग आला आहे. जेव्हा कॅब ड्रायव्हर्स व्यवसाय करतात आणि लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडण्यासाठी पैसे आकारतात, तेव्हा गाडी स्वच्छ ठेवण्यात किंवा देखभाल करण्यात काय अडचण आहे?” तर दुसरा म्हणतोय की, “आजकाल सगळ्याच महिला प्रत्येक विषय टोकाला घेऊन जातात आणि वेगळाच अर्थ काढतात. त्यांना वाटते की, त्यांना काहीही करण्याचा आणि कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. कारण आपला कायदा आणि समाज त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगतो. पण, हा कायदा त्यांनी गरीब आणि असहाय्य लोकांना धमकावण्यासाठी वापरू नये” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.