Lion Video from Junagadh: गुजरातच्या जुनागढमधील गजबजलेल्या रस्त्यावर लोक आपल्या रोजच्या गडबडीत, गाड्यांच्या आवाजात आणि हॉर्नच्या गोंगाटात गुंतलेले… आणि अचानकच त्यांच्यासमोर असा एक पाहुणा उभा राहिला, ज्याचं दर्शन लोकांना फक्त टीव्ही स्क्रीनवर किंवा जंगल सफारीतच मिळतं – ‘जंगलाचा राजा’ बब्बर सिंह. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. इंजिनांचे आवाज मंदावले. पायांखालची जमीन जणू हलली आणि सगळ्यांच्या नजरा त्या एका ठिकाणी खिळून राहिल्या. सिंह शांतपणे रस्त्याच्या कडेला उभा होता; पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळेच तेज… एक न बोलता सांगणारा इशारा.

गुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातील बिलखा रोडवर ५ ऑगस्ट रोजी एक थरारक प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्दळ सुरू असताना अचानक रस्त्याच्या कडेला ‘जंगलाचा राजा’ म्हणजेच बब्बर सिंह दिसला… आणि पाहता पाहता परिसरात खळबळ उडाली. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये दिसतं की, रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. त्याच वेळी एका व्यक्तीच्या नजरेस रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा असलेला सिंह पडतो. ते पाहताच काही वाहनचालकांनी तत्काळ आपली गाडी थांबवली, तर काहींनी घाबरून लगेच दिशा बदलली. मात्र, काही धाडसी लोकांनी आपल्या गाडीतून उतरून मोबाईल काढले आणि सिंहाचे थेट व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली.

सुमारे १७ सेकंदांच्या या व्हिडीओत सिंह पूर्णपणे शांत असल्याचे दिसते. तो कुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत नाही. फक्त डोळे टक लावून तो लोकांकडे पाहत उभा असतो; पण अचानक एक इसम हातात काठी घेऊन सिंहाकडे वेगाने जातो आणि “हुर्र-हट” करीत त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करतो. या हालचालीमुळे सिंह घाबरतो आणि वळून जंगलाच्या दिशेने निघून जातो.

बिलखा रोड हा गीर नॅशनल पार्कच्या हद्दीला लागून असल्याने इथे सिंहाचे दर्शन होणं काही नवीन नाही. तरीदेखील रस्त्याच्या कडेला अशा जवळून सिंह दिसणं, तेही शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी, हा अनुभव अनेकांसाठी रोमांचकारी ठरला.

हा व्हिडीओ @mprsd5 या X (माजी ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी तो पाहिला असून, कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले – “काठीवाले भाऊसाहेबांचा कॉन्फिडन्स पाहण्यासारखा आहे! सिंहाला जसं कुत्र्याला हाकलवतात तसं हुसकावलं.” तर दुसऱ्याने गमतीत म्हटलं, “सिंहही विचार करत असेल, मी नेमका कुठे आलो रे!”

येथे पाहा व्हिडीओ

अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला आठवण करून देतात की, जंगल आणि त्यातील वन्यजीव आपल्या शेजारीच आहेत आणि त्यांचा आदर ठेवूनच वावर करणं गरजेचं आहे.