LPG Gas Cylinder Leak Video : गॅसगळतीमुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना होतात. त्यामुळे वर्षातून एकदा गॅस जोडणीची तपासणी करणे आवश्यक असते. पण, शुल्क आकारले जात असल्यामुळे अनेकदा आपण तपासणी करणे टाळतो आणि मग मोठ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये घरात गॅसगळती झाल्यामुळे मोठा अपघात होता होता टळला आहे.
व्हायरल व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे. घटनेचे नेमके ठिकाण कळू शकलेले नाही. पण, सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून येते की, ही घटना बुधवारी १८ जून रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. व्हिडीओमध्ये एलपीजी सिलिंडरच्या पाइपमधून गॅसगळती होत असल्याचे दिसून येते. व्हिडीओमध्ये घरातील एक महिला गॅसगळती नियंत्रित करण्याचा आणि थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे; पण असे करण्यात ती अयशस्वी ठरते. भयावह घटना हाताबाहेर जात असल्यामुळे ती मदतीसाठी बाहेर धाव घेते.
यादरम्यान बराच वेळ पाइपद्वारे पूर्ण घरात गॅसगळती होताना दिसते आहे; जे पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर काही मिनिटांनी महिला एका पुरुषाला मदतीसाठी घेऊन येते आणि गॅसगळती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. घराला दोन दरवाजे असतात. महिला आणि पुरुष वेगवेगळ्या दरवाजांनी आतमध्ये येतात आणि दोघेही सिलिंडरच्या जवळ पोहोचतात. त्यानंतर गॅस पाईपचा नॉब बंद करून गॅसगळती थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात.
नशीब घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या होत्या (Viral Video)
पण, पाईपमधून भरपूर प्रमाणात गॅसगळती झाल्यामुळे संपूर्ण खोलीत गॅस भरला होता. पुरुष गॅस पाईपचा नॉब बंद करण्याचा प्रयत्न करत असतानाच खोलीच्या स्वयंपाकघरात एक मोठा स्फोट झाला. स्वयंपाकघरात ठेवलेल्या गॅस स्टोव्हमधून आगीच्या ज्वाळा सुरू होतात आणि संपूर्ण घरात आग वेगाने पसरली. मोठी आग लागली आणि खोलीतील काही वस्तूंनी पेट घेतला. सुदैवाने गॅसगळतीदरम्यान महिलेने घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. त्यामुळे स्फोटाचा परिणाम जास्त प्रमाणात जाणवला नाही. तसेच दोघांनीही घराच्या बाहेर पळ काढल्यामुळे या मोठ्या स्फोटातून महिला आणि पुरुष दोघेही सुखरूप बचावले.
व्हिडीओ नक्की बघा…
एलपीजी सिलिंडरच्या पाईपमधून गॅसगळती झाल्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात स्फोट होऊनही महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले. हे पाहून या आश्चर्यचकित करणाऱ्या बचावात्मक दृश्याचा व्हिडीओ @Satyamraj_in या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हायरल झाला आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘दोघेही भाग्यवान आहेत. नशीब घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या होत्या, ज्यामुळे बराचसा वायू बाहेर पडू शकला आणि स्फोटाचा परिणाम लक्षणीयरीत्या कमी झाला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.