Video Shows Student Touch Security Guard Women Feet : महाविद्यालय असो किंवा शाळा; पहिला आणि शेवटचा असे दोन्ही दिवस आपल्यासाठी खूपच जवळचे असतात. कारण- या दोन्ही दिवसांना पार केल्यानंतर एक वेगळेच जग आपली वाट पाहत असते. त्यामुळे शेवटचा दिवस खास करण्यासाठी फेअरवेल, सॅण्ड ऑफ असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या दिवशी विद्यार्थी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतात, ज्यांनी या प्रवासात त्यांना कळत-नकळत भरपूर मदत केलेली असते. तर, आज असेच काहीसे दृश्य दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ नागपूरचा आहे. नागपूरच्या सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस असतो. यादरम्यान कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांचा निरोप घेण्यासाठी काही विद्यार्थी आलेले असतात. एक विद्यार्थी तर मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांबरोबर महिला सिक्युरिटी गार्डच्याही पाया पडतो. हे पाहून महिला सिक्युरिटी गार्डला अश्रू अनावर होतात आणि ती विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप देत त्याला मिठीसुद्धा मारते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

सिक्युरिटी गार्डच्या पाया पडतो (Viral Video)

सिक्युरिटी गार्ड अनेकदा गेटमधून प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे चेहऱ्यावर हसू ठेवून स्वागत करतात; ज्यामुळे प्रत्येकाचा दिवस आणखीन खास होऊन जातो. पीरियड बंक करून गेटबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना ओरडणे असो किंवा विद्यार्थ्यांनी सिक्युरिटी गार्डबरोबर केली जाणारी मस्करी असो; विद्यार्थ्यांच्या कॉलेज लाईफमध्ये सिक्युरिटी गार्डची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, हेच लक्षात ठेवून विद्यार्थी कॉलेजच्या शेवटच्या दिवशी महिला सिक्युरिटी गार्डच्याही पाया पडतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ft.saruuuu आणि @___sargam या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा भावूक झाले आहेत. “व्हिडीओवरून कळू शकते की, या विद्यार्थ्याने चार वर्षांत किती कमवलं आहे”, “सिक्युरिटी गार्ड तुमच्यातील एक भाग त्यांच्याबरोबर घेऊन जातात”, “हेच खऱ्या आयुष्यातील खरे यश आहे”, “मुले आणि त्यांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी असलेले नाते नेहमीच अनोखे असते” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.