Video Shows Teacher Plan Best Surprises For Her Students : शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते कसे असावे यावर अनेकदा वेगवेगळी उदाहरणे दिली जातात. जुन्या पिढीचे लोक जेव्हा या नात्याविषयी बोलतात तेव्हा असे म्हणतात की, पूर्वी शिक्षकाला मुले खूप घाबरायची; पण आजकाल घाबरत नाहीत. पण, बघायला गेल्यास आजकाल विद्यार्थ्यांना ओरडणारे नव्हे, तर थोडे समजून घेणारे, त्यांना समजेल अशा रीतीने शिकवणारे, त्यांच्या आनंदात सहभागी होणारे आणि त्यांचा मूळ स्वभाव न बदलता, त्यांचा स्वीकार करणारे अर्थात, थोडे कूल (cool) शिक्षक हवे असतात. म्हणून अनेकदा काही विद्यार्थी शिक्षकांना त्यांच्या खास दिवशी भन्नाट सरप्राईजसुद्धा देतात. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओनुसार (Video), आज शिक्षिकेने विद्यार्थ्यांना खास सरप्राईज देण्याचे ठरवले आहे. कारण- त्या दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा शेवटचा दिवस असतो. शिक्षिका ज्या वर्गाची वर्गशिक्षिका असते, ते विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी ती दुसऱ्या वर्गातील काही विद्यार्थिनींना घेऊन वर्गाची खास सजावट करण्यास सुरुवात करते. एका पांढऱ्या कापडावर तिने आधीच विद्यार्थ्यांच्या हातांचे ठसे उमटवून घेतलेले असतात. हे कापड शिक्षिका फळ्यावर चिकटवते. त्यानंतर स्वतः फुगे फुगवून ते लावते. तसेच विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू म्हणून एक पेन आणि संपूर्ण वर्गाचा एक ग्रुप फोटो छापलेला एक केकसुद्धा आधीच ऑर्डर करून ठेवते. व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा शिक्षिकेचे हे खास सरप्राईज…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, शिक्षिका वर्गात येताना तिच्या एका हातात ट्रे असतो. त्यात टिळा लावण्यासाठी कुंकू आणि पेन; तर दुसऱ्या हातात केक असतो. त्यानंतर विद्यार्थी आल्यावर ती वर्गाचा दरवाजा उघडते. वर्गाची सजावट आणि केक, भेटवस्तू अशी सगळी तयारी केलेली पाहून विद्यार्थी खूश होतात. शिक्षिका विद्यार्थ्यांना बाकावर बसायला सांगते. त्यानंतर ती प्रत्येकाला टिळा लावते आणि भेटवस्तू म्हणून पेन देते. यादरम्यान बरेच विद्यार्थी शिक्षिकेच्या पाया पडतात; तर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटतात. त्यानंतर सगळे मिळून केक कापतात आणि हा दिवस आणखीन खास करतात.

विद्यार्थी खूप लकी आहेत…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @ritikaayadav97 आणि @atinbunny42 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘चला, माझ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना सरप्राईज देऊ. त्यांचा शाळेतील शेवटचा दिवस आहे आणि ते पुन्हा येथे परत येणार नाहीत. या वर्गाची वर्गशिक्षक म्हणून मी माझ्या मुलांना अशा खास पद्धतीने निरोप देत आहे,’ अशी कॅप्शन शिक्षिकेने व्हिडीओला दिली आहे. नेटकऱ्यांना व्हिडीओ पाहून, त्यांच्या शाळा आणि कॉलेजच्या दिवसांची आठवण आली आहे. त्यांनी, विद्यार्थी खूप लकी आहेत. कारण त्यांना अशी शिक्षिका मिळाली. इयत्ता १२ वीचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप खास असतात आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात त्या शिक्षकांसाठी विशेष स्थान असते. खूप भावूक करणारा व्हिडीओ आहे हा आदी अनेकविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच, बऱ्याच विद्यार्थ्यांनीही शिक्षिकेला धन्यवाद म्हणण्यासाठी कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows teacher saying goodbye to her class xii children in unique style asp