रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांबाबत आपण नेहमी ऐकतो. बहुतांश वेळा याचे मूळ कारण प्रवाशांची घाई किंवा त्यांचा निष्काळजीपणा असतो. रेल्वे रुळ ओलांडू नका असे अनेकवेळा सांगितले जाते. तरीही अनेकजण पूल चढण्याचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात, पण यामध्ये अनेकांचा अपघात होतो. सध्या असाच एका अपघातातून काही सेकंदाने वाचलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील होशंगाबाद रेल्वे स्टेशनमधील आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वे रुळ ओलांडुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी त्या रुळावरुन लांबून भरधाव वेगाने रेल्वे येतानाचे तिथल्या स्टेशन मास्तरांना दिसते, ते धावत जाऊन या महिलेला प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी मदत करतात. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने या महिलेचा जीव वाचतो. पाहा काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हायरल व्हिडिओ.
व्हायरल व्हिडीओ :
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. स्टेशन मास्तरांच्या प्रसंगावधानामुळे या महिलेचा जीव अवघ्या काही सेकंदाने वाचला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या स्टेशन मास्तरांनी मदतीसाठी धाव घेतली, हे पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.