Kelvan Like a Grand Wedding Viral Video : मित्र-मैत्रिणीचं, लाडक्या भावा-बहिणीचं लग्न ठरलं की, आपण हमखास त्यांना केळवणासाठी बोलावतो. त्यांच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवतो आणि त्यांना खाऊ लागतो. एवढेच नाही तर त्यांना छान केळीच्या पानात जेवायला वाढतो, सुंदर सजावट करून त्यांना बसण्यासाठी पाट सुद्धा देतो. इतकेच नाही तर त्यांना भेटवस्तू सुद्धा देतो. पण, आज सोशल मीडियावर केळवणाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो कदाचित तुम्हालाही थक्क करून सोडणार आहे.

मामा आपल्या लाडक्या भाचीला केळवणासाठी घरी आमंत्रित करतो. मामा हौशी असतो म्हणून त्याने अगदी केळवणाची जय्यत तयारी केलेली दिसते आहे. लाडकी भाची सृष्टीचा फोटो आणि तिच्या नावाचा भलामोठा बॅनर बनवून घेतलेला असतो. त्यानंतर अगदी घराच्या अंगणापासून ते अगदी ती जेवायला बसणार तिथपर्यंत सगळीकडे फुलांच्या तर काही रंगाच्या रांगोळ्या घातलेल्या दिसत आहेत. एवढेच नाही तर अगदी लग्न एखाद्या कार्यक्रमात जेवणाची सोय करतात अगदी त्याचप्रमाणे घराच्या बाहेर मांडव घालून तयारी केलेली दिसते आहे.

“वाह कसलं भारी” (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, रांगोळी काढणाऱ्या ताईने भाची सृष्टीचा चेहरा आणि जेवणाच्या पदार्थांनी भरलेलं केळीचे पान हुभेहूब रांगोळीत रेखाटले आहे आणि सुंदर रांगोळी काढली आहे; जे बघून तुम्ही सगळेच भारावून जाल. लाडक्या भाचीचे प्रत्येक पाऊल फुलांवर पडेल अशी सुद्धा अनोखी तयारी मामाने केली आहे. जर केळवण इतकं भारी केलं आहे तर लग्न कसं असेल हे जाणून घेण्याचीही इच्छा नेटकऱ्यांमध्ये निर्माण झालेली दिसते आहे. एकदा बघाच हे खास केळवण…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rajashribhagawat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सृष्टीचे केळवण” अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “किती नशीबवान आहेस पोरी”, “असा हौशी मामा भेटायलाही नशीब लागत”, “एवढ्या खर्चात आमच्या इकडे लग्न उरकून होतात; पण, जिचे केळवण आहे ती खरच नशीबवान आहे”, “वाह कसलं भारी”, “केळवणाला एवढं मग लग्नाला काय केलं असेल” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.