Vulgar LinkedIn Post Viral: मुंबईतील एका महिलेनं सांगितलं की एका माणसाने, तिला तिच्या कमरेचं फोटो दाखवण्यासाठी ₹५,००० देण्याची ऑफर दिली. महिलेने पुरावे दाखवत त्या माणसाची विकृती सगळ्यांसमोर आणली आहे.
LinkedIn हे प्रोफेशनल नेटवर्क असलं तरी मुंबईच्या क्रिएटिव्ह फ्रीलान्सर शुभांगी बिस्वाससाठी ते एक अश्लील आणि अनपेक्षित प्रसंगाचं ठिकाण ठरलं. तिच्या आता व्हायरल झालेल्या LinkedIn पोस्टनुसार, चेन्नईचा आशिक नेहरू नावाचा एक माणूस तिला जॉब ऑफर देण्यासाठी रात्री उशिरा संपर्कात आला, पण थोड्याच वेळात त्याचा खरा हेतू समोर आला.
“मी तुला ₹५,००० देईन, फक्त मला तुझी कंबर दाखव,” असं त्या माणसानं शुभांगीला सांगितलं. तिनं त्याच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिलं, “सुरुवातीला वाटलं कामाबद्दल बोलतोय. पण मग ‘मी पैसे देतो’ असं म्हणणं, गोंधळलेली भाषा, आणि शेवटी खरा उद्देश समोर आला. हे ना कामाचं प्रपोजल होतं, ना प्रोजेक्ट. फक्त शरीराच्या बदल्यात पैसे.”
शुभांगी म्हणाली की हा एकच प्रकार नाही आहे. तिने लक्ष वेधलं की महिला, विशेषतः फ्रीलान्सर, यांना अशा बनावट ऑफर आणि असभ्य मेसेजद्वारे अनेकदा लक्ष्य केलं जातं.
“अशा लोकांना वाटतं की महिलांना लाज वाटून त्या काही बोलणार नाहीत. पण मी माझा सन्मान गमावून त्याची इज्जत वाचवणार नाही,” असं तिने स्पष्टपणे सांगितलं.
तिने आपल्या पोस्टचा शेवट ठाम संदेशाने केला: “जे पुरुष समजतात की ₹५,००० देऊन मला गप्प करता येईल किंवा झुकवता येईल, त्यांनी नवीन स्क्रिप्ट लिहावी. कारण माझ्या आयुष्याच्या कथेचे दिग्दर्शक तुम्ही नाही.”
पुढच्या पोस्टमध्ये तिनं त्या माणसाशी झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि त्याचा मोबाईल नंबरही उघड केला. तिने सांगितलं की नंतर त्यानं माफी मागायचा प्रयत्न केला, दारूच्या नशेत झालं असं म्हणून दारूवर दोष टाकला, पण तरीही तिला व्हॉइस कॉल आणि भावनिक दबाव टाकणारे मेसेज पाठवत राहिला.
“जेव्हा तुम्ही आवाज उठवता, तेव्हा लोक म्हणतात – ‘तू जास्त बोलतेस.’ म्हणून इथे मी पुरावा दिला आहे,” असं शुभांगी म्हणाली.
“तो आधी प्रोफेशनल पद्धतीनं संपर्कात आला. पण एका रात्री उशिरा, त्यानं मला ₹५,००० देतो, फक्त कंबर दाखव अशी ऑफर दिली. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. जेव्हा मी त्याला थेट उत्तर दिलं, तेव्हा तो माफी मागायला लागला, वारंवार माफ करा असे मेसेज पाठवले, दारूवर दोष टाकला आणि भावनिक होऊन मला गुंतवायचा प्रयत्न केला. विचित्र व्हॉइस कॉलपासून ते बनावट प्रोफेशनल वागणूक – हे सगळं पद्धतशीर होतं,” असं ती म्हणाली.
अनेक LinkedIn युजर्सनी शुभांगीचं कौतुक केलं की तिनं हा प्रकार थेट उघड केला. कामासाठी असलेल्या प्लॅटफॉर्म्सचा असा गैरवापर होतो यावर काही लोकांनी राग व्यक्त केला. इतरांनीही अशाच प्रकारचे अनुभव शेअर केले – जिथे कामाचं म्हणत अश्लील मेसेज पाठवले गेले.