Billionaire’s Nanny Cassidy O’Hagan: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांची स्पर्धा जीवघेणी बनली आहे. मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी तासनतास काम करताना वैयक्तिक आयुष्यातील आवडी-निवडी बाजूला ठेवाव्या लागतात. मात्र २८ वर्षीय कॅसिडी ओ’हेगन यांनी कॉर्पोरेट जगतातून बाजूला होत, वेगळा मार्ग निवडला. या निर्णयामुळे त्यांना आर्थिक लाभ तर झालाच, पण त्याशिवाय कॉर्पोरेटमधील घुसमट, स्पर्धा दूर झाली. त्याची जागा आता निव्वळ आनंदाने घेतली. कॅसिडी ओ’हेगन आता अब्जाधीशांचे मुले सांभाळणारी आया (नॅनी) झाली आहे.
इन्स्टाग्रामवर आपण एन्फ्लुएन्सर्सना विविध देशांत फिरताना, उंची जीवनशैली जगताना पाहतो. कॅसिडी त्यापेक्षाही अधिक चांगले जीवन जगत आहे, तेही दुसऱ्यांच्या पैशांने. हिवाळ्यात ती अस्पेनमध्ये आहे. दुसऱ्या एखाद्या ऋतूमध्ये ती मालदीव, भारत किंवा दुबई या देशांमध्ये असते. मालकाच्या मुलांना सांभाळण्यासाठी ती त्यांच्या खासगी जेटने प्रवास करते. या कामासाठी तिलाही अब्जाधीशांप्रमाणे जीवनशैली जगता येते.
बिझनेस इनसाइडरने दिलेल्या माहितीनुसार, कॅसिडी ओ’हेगनला तिच्या कामाच्या बदल्यात आरोग्य विमा, पगारी सुट्टी, खासगी शेफने बनवलेले जेवण आणि तिचा स्वतःचा नॅनी वॉर्डरोब मिळाला आहे. कॅसिडी सांगते, माझ्या मेडीकल सेल्सच्या कॉर्पोरेट नोकरीत मला हे फायदे मिळू शकले नसते.
अब्जाधीशांच्या जगतात कशी आली?
कॅसिडी ओ’हेगनने २२ व्या वर्षी २०१९ साली एमसॅट परीक्षेची तयार सुरू केली, तेव्हापासून तिचा नोकरीचा प्रवास सुरू झाला. शिक्षण घेता घेता पैसे मिळवण्यासाठी तिने श्रीमंतांची मुले सांभाळण्याचे काम केले. मी जेव्हा हे काम सुरू केले, तेव्हा हे पूर्णपणे वेगळे जग असल्याचे माझ्या लक्षात आले, असे कॅसिडीने सांगितले.
कॅसिडी पुढे सांगते, २०२१ साली मी अनुभव घेण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात उतरले. न्यूयॉर्क शहरात मी मेडीकल सेल्स विभागात काम केले. तेव्हा मला ६५ हजार डॉलर (भारतयी चलनात ६० लाख रुपये) वार्षिक पगार होता. पण यासाठी मला अनेक तास काम करावे लागायचे. ज्यामुळे मी थकून जात असे. वर्षभरातच मी कॉर्पोरेट जगताला राम राम ठोकून पुन्हा आया होण्याचा निर्णय घेतला. “मला पुढे जाणवले की, मला ज्या कामात आनंद मिळत होता, तेच काम मी सोडून दिले होते”, असे कॅसिडीने सांगितले.
सेल्सच्या कामापेक्षा दुप्पट वेतन
कॅसिडीने पुन्हा आयाचे काम सुरू केल्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या माहितीनुसार, कॅसिडीने तिचे मूळ वेतन उघड केलेले नाही. तरीही तिचे वार्षिक वेतन १,५०,००० ते २,५०,००० डॉलर्सच्या घरात असल्याचे म्हटले जाते. जे भारतीय चलनात वर्षाला १.३ कोटी रुपयांच्या घरात जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात तिला मिळणाऱ्या वेतनाच्या जवळपास दुप्पट वेतन ती आया बनून मिळवत आहे.
