वसई: पश्चिम रेल्वेवरील विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवाशांकडून रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करण्याचे प्रकार सुरूच आहे. रेल्वे रूळ ओलांडून प्रवास केला जात असल्याने अपघाताच्या घटना समोर येत असतात. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षाबलाकडून रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मागील दीड वर्षात अंधेरी ते डहाणू यादरम्यान सुमारे पाच हजार प्रवाशांवर कारवाई केली आहे.
रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचे सत्र सुरूच आहे.रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर अधिक धोकादायक आहे. परंतु लवकर जाण्यासाठी, जिने चढउतार करण्याचा कंटाळा अशा प्रकारामुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात. सद्यस्थितीत लोकल, मालवाहतूक गाड्या, मेमो , एक्सप्रेस अशा गाड्यांच्या फेऱ्या ही वाढल्या आहे. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणे अधिक धोक्याचे बनले आहे.
प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी पादचारी पूल, सरकते जिने, संरक्षण जाळ्या, उड्डाणपूल , भुयारी मार्ग आदींची व्यवस्था केली आहे. तरीही काही प्रवासी अजूनही रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करीत असतात. विरार रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अंधेरी ते डहाणू या स्थानकांच्या दरम्यान ही रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करण्याचे काम सुरूच आहे. विशेषतः नालासोपारा, विरार अशा ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी रूळ ओलांडून जाताना दिसून येत आहेत. अशा प्रवाशांना आवर घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई केली जात आहे. २०२४ ते जून २०२५ या दीड वर्षाच्या कालावधी दरम्यान ४ हजार ९७२ इतक्या रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलातर्फे कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ लाख ३६ हजार इतका दंड ही वसूल करण्यात आल्याचे रेल्वे सुरक्षाबलाकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षाबलाकडून जनजागृती
प्रवाशांची रुळ ओलांडण्याची सवय बंद होण्याची चिन्हे दिसत नाही. अपघात रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम देखील रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस यांच्या मार्फत राबविली जात आहे. आम्ही वेळोवेळी रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक आहे असे सांगत जनजागृती मोहीमा हाती घेतो, त्यांच्यावर कारवाई करतो, मात्र प्रवासी रूळ ओलांडत असतात असे रेल्वे सुरक्षाबलाकडून सांगण्यात येत आहे.
अनियमित वेळेचाही फटका
पश्चिम रेल्वेवर पालघर ते चर्चगेट, विरार ते चर्चगेट असा लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी हे बेसुमार वाढले आहेत. काहीवेळा लोकल ठरलेल्या वेळात स्थानकात दाखल होत नाही तर काहीवेळा एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाते अशा वेळी प्रवाशांची अतिघाई होत असते. त्यामुळे काही प्रवासी थेट स्थानकात उड्या घेत रेल्वे रूळ ओलांडून जात असतात.
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जे प्रवास करतात त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. प्रवाशांनी सुद्धा रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करू नये – कल्याण डी. मोरे, सहायक आयुक्त रेल्वे सुरक्षा बल विरार
रेल्वे रूळ ओलांडून प्रवास कारवाई आकडेवारी
वर्ष – कारवाई – दंड
२०२४ – ३२५४ – ९ लाख ४८ हजार २००
२०२५ – १७१८ – ३ लाख ८७ हजार ८००