वसई : रविवारी वसई विरार मध्ये ही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विठू नामाचा गजर, पालखी सोहळा, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांतून विठू नामाच्या गजराने वसई नगरी दुमदुमून गेली होती.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वसई विरार मध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. नालासोपारा पश्चिम नवाळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.श्री शंकराचार्य मंदिर निर्मळ ते विठ्ठल मंदिर नवाळे पर्यँत पारंपारिक वेशभुषेत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. 

वसईत ही साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि यंगस्टार ट्रस्टने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही आषाढी निमित्ताने दिंडी आणि पालखीचे तसेच अभांगवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वसई गावातील गुजराथी शाळेजवळील विठ्ठल मंदिरातून हि दिंडी भर पावसात निघाली होती. दिंडीच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होती. दिंडी मध्ये महिला आणि पुरुषांनी घातलेल्या फुगड्या साऱ्याचे लक्ष वेधून घेतले.तर अर्नाळा कोळीवाड्यात दिंडी काढण्यात आली होती.दिंडीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होत टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करण्यात आला.

तर नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथील विठ्ठल मंदिरा एकादशी साजरी करण्यात आली आहे. तर कामण येथे ही विठ्ठल मंदिरात एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. वसईत प्रमुख विठ्ठल मंदिर असलेल्या विरार  पश्चिम व   वसई पूर्वेतील वालिव येथील विठ्ठल रुख्माई मंदिरात पहाटे पासून पूजा अर्चा ,भजन , कीर्तन व तीर्थ  प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळांमधील दिंड्यामधून सामाजिक संदेश

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच वसई विरार मधील शाळा महाविद्यालयात विठू नामाचा गजर पाहायला मिळाला. पारंपारिक वेशभूषेतील वारकरी विद्यार्थी, दिंडी सोहळा, नृत्य असे  विविध कार्यक्रम विठ्ठल पांडुरंगाचा गजरात पार पडले. या दिंडी सोहळ्यातून विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ जनजागृती, पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण असे विविध सामाजिक संदेश दिले.

कलाकृतीतून विठ्ठलाला वंदन 

वसई विरार मधील कलाकारांनी विठ्ठलाच्या विविध कलाकृती साकारून आषाढी एकादशी साजरी केली. वसईतील कौशिक जाधव या कलाकाराने श्रीफळ फोडून त्यात सुबक असे विठ्ठलाचे चित्र रेखाटले होते. जूचंद्र येथील कलाकार जयकुमार भोईर व संजय म्हात्रे यांनी विठ्ठलाचे स्केच काढले होते.