वसई: दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने वसई-विरारमधील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे . रांगोळी, विविध आकाराच्या पणत्या, रंगीबेरंगी आकाश कंदील आणि फटाक्यांनी बाजारपेठा सजल्या असून, रविवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत बाजारात मोठी गर्दी केली होती. वसई-विरार शहरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा बाजारपेठेत पारंपरिक मातीच्या पणत्यांसह शंखू, मडकी, तुळस अशा विविध आकाराच्या, रंगीबेरंगी आणि मणी-हिऱ्यांनी सजवलेल्या पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. लहान मातीच्या पणत्या ८० रुपये डझन तर मोठ्या पणत्या १२० रुपये डझन किंमतीने विकल्या जात आहेत. मातीच्या पणत्यांसह चिनी मातीच्या पणत्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. पन्नास रुपये जोडी अशा दराने या पणत्यांची विक्री केली जात आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत तीस रुपयांनी यंदा पणत्या महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आकाश कंदिलांमध्येही यंदा विविधता पाहायला मिळत आहे. चायनीज बनावटीच्या कंदिलांसह पारंपरिक पद्धतीने तयार केलेले, प्लास्टिक, कागद आणि कापडाचे कंदील बाजारात दाखल झाले आहेत. हे कंदील १२० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत तर नक्षीकाम केलेले सुबक कंदील ३०० रुपयांपासून १ हजार  रुपयांपर्यंत विकले जात आहेत. कंदिलांच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिक प्रामुख्याने प्लास्टिक आणि कागदी कंदिलांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

रांगोळीचे दर स्थिर

यंदा आकाशकंदील आणि पणत्यांचे भाव वाढले असले तरी रांगोळीचे आणि रांगोळी काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाचे दर मात्र स्थिर असल्याचे दिसून येत आहे. याही वर्षी एक ग्लास रांगोळी दहा रुपये दराने विकली जात आहे. तर गेरू, रांगोळीसाठी वापरली जाणारी चाळण, ठिपक्यांच्या बाटल्या, रांगोळीचे साचे, तयार रांगोळ्या यांचे दर दहा ते वीस रुपयांच्या घरातच आहेत.

नाविन्यपूर्ण सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी

दिवाळीच्या सजावटीसाठी यंदा बाजारात नाविन्यपूर्ण सामानाची मागणी वाढली आहे. यामध्ये पितळीच्या दिव्यांच्या थाळ्या, मण्यांनी सजवलेले होल्डर, सुगरणीच्या खोप्याच्या आकाराचे पणती होल्डर, विजेवर चालणारे दिवे, विविध तोरणे, झुंबर आणि काचेचे कंदील अशा अनोख्या वस्तूंना नागरिकांची पसंती मिळत आहे. हे सजावटीचे सामान शंभर रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. यामुळे या साहित्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

सुक्या मेव्याच्या खरेदीत वाढ

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वस्तू व सेवा करात (जीएसटी) केलेल्या बदलांमुळे यंदाच्या दिवाळीत सुकामेव्याचे दर २० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. वस्तू व सेवा कर कमी झाल्यामुळे सुक्या मेव्याच्या दरातही बदल झाल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. यामुळे बदाम, जर्दाळू, अंजीर, पिस्ता आणि खजूर यांसारख्या सुक्या मेव्याच्या घाऊक दरात लक्षणीय घट झाल्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुक्या मेव्याच्या खरेदीत वाढ झाली असल्याचे वसईतील एका विक्रेत्याने सांगितले आहे.