वसई: एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असताना दुसरीकडे वसईतील वाद्य कारागिर वाद्यांना नवीन साज चढविण्यात मग्न झाले आहेत. सध्या वाद्यांना साज चढविण्याचे काम जोरात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गणेशोत्सव काळात आरत्या, भजन कीर्तन, जाकडी, टिपऱ्या असे विविध प्रकारचे पारंपारीक कार्यक्रम घरोघरी होत असतात. यावेळी ढोलकी, तबला, मृदुंग यासह इतर लागणाऱ्या वाद्यांना मोठी मागणी असते.
वाद्याचा सूर अगदी खणखणीत असला पाहिजे जेणेकरून कार्यक्रमाची रंगत वाढेल या उद्देशाने अनेक भजन मंडळी तबला, ढोलकी आदि वाद्ये खरेदीसाठी किंवा त्यावर नवा साज चढविण्यासाठी वसईआनंद नगर येथील वाद्य कारागिरांकडे येत आहेत.गुजरात, मुंबई, पुणे , लातूर, बनारस या ठिकाणहून नवीन वाद्य व त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य कारागिरांनी मागविले आहे.
मागील महिना भरापासून वाद्यांना साज चढविणे, त्याची दुरुस्ती करणे अशी कामे सुरू झाली आहे. हा गणेशोत्सव संपेपर्यंत ही कामे सुरूच राहतील असे वसईतील वाद्य कारागिरांनी सांगितले आहे.
वाद्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ
वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ५०० ते १००० रुपयांनी वाद्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. सुरवातीला ढोलकी चार हजार रुपयांना होती तिची किंमत पाच हजार, ढोलक साडे तीन ते चार हजार, पखवाज नऊ हजार, मृदुंग साडे आठ हजार, तबला नऊ ते दहा हजार अशा प्रकारे यंदाच्या साधारपणे किंमती आहेत असे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
पावसामुळे वाद्यांचे नुकसान
आठवड्याभरापूर्वी शहरात कोसळलेल्या पावसामुळे दुकानात पाणी शिरले होते. त्यामुळे तयार तबला, ढोलक, पखवाज तसेच वाद्यांच्या डागडुजीसाठी मागवलेले चामड्याचे सामान याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच, वाद्य खराब झाल्यामुळे ग्राहकांनी अचानक ऑर्डर रद्द केल्यामुळे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याचे वाद्य व्यावसायिकांनी सांगितले.
मागील तीस वर्षाहून अधिक काळापासून वाद्यांची विक्री व वाद्यांना साज चढविण्याचे काम करीत आहोत. दरवर्षी प्रमाणे यंदाही भजनी मंडळं, कव्वाली मंडळं, परदेशातील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मोजके आणि शिकाऊ कारागीर असल्यामुळे ग्राहकांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आमचीही धावपळ सुरु आहे. :- आनंद काशिनाथ पवार , वाद्य व्यावसायिक वसई