विरार : वसई विरारमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक सेवेसह वसई विरार शहर पालिकेची परिवहन सेवाही ठप्प झाली आहे. सध्या विरार आणि नालासोपाऱ्यातील नागरिकांना खाजगी ट्रॅक्टरचा आधार असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे आधीच समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सोमवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असून पहाटेपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाळमुळे मंगळवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम शहरातील वाहतूक सेवेवर झाला आहे. गेले तीन दिवस रस्त्यावरील पाणी ओसरले नव्हते पण शहरातील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. आज कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विरार पश्चिमेच्या खोरोडी पासून ते विरार रेल्वेस्थानकापर्यंत खाजगी ट्रॅक्टरसेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त आणि इतर महत्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरमधून धोकादायक प्रवास करावा लागत असलयाचे चित्र आहे. नालासोपाऱ्यातही हीच स्थिती असून सोपाऱ्याच्या पश्चिमेला मुख्य रस्त्यावर पालिकेच्या अनेक बसेस बंद पडल्या आहेत. तिथेही खाजगी ट्रॅक्टर सेवा सुरु करण्यात आली आहे. काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.

दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास वाहतूक सेवा कोलमडते असे असून सुद्धा प्रशासनाकडून वाहतुकीची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थिती आरोग्यसेवेसह इतर आपत्कालीन सेवा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासही अडथळे निर्माण होत असलयाचे दिसून येत आहे.

धोकादायक प्रवास

खाजगी ट्रॅक्टर चालकांकडून ३० ते ५० रुपयांपर्यंत असे दर आकारण्यात येत आहेत. एकाच वेळी १५ ते २० ट्रॅक्टरमधून प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. काही ठिकाणी तर ट्रॅक्टरच्या जॉईंटवरही नागरिक उभे असल्याचे दिसत आहेत. इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अशा पद्धतीने धोकादायक प्रवास करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.