वसई: मागील दोन दिवसांपासून वसई विरार भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा मोठा भात शेतीला बसला असून कापणीसाठी तयार होत होत असलेली भाताची कणसे आडवी झाले आहे. यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वसईच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील भागात ७ हजार हेक्टरहून अधिक जागेत खरिपाची लागवड करण्यात आली आहे. यात गर्व, निमगर्व व हलव्या अशा भात पिकांचा समावेश आहे. काही ठिकाणी निमगरव्या भाताची निसवण सुरू झाली होती. तर काही ठिकाणी हळवे भातपूर्ण निसवले असून कणसात दाणेही भरले आहेत. तर दुसरी गरव्या भाताची कणसेही हळूहळू तयार होऊ लागली आहे. परंतु वसई विरार भागात सप्टेंबर महिना संपत आला तरीही पावसाचा जोर कायम आहे.
मागील दोन दिवसांपासून अधूनमधून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वारा पाऊस जोराने सुरू असल्याने याचा मोठा फटका भात शेतीला बसला. या झालेल्या पावसामुळे पूर्णतः पिकेच आडवी झाली आहेत. भाताची कणसे तयार होण्याच्या काळात पावसाची उसंत मिळायला हवी होती. मात्र जोराचा झाल्याने पिकांची अक्षरशः दैना केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
हळवी शेती गेल्यात जमा आहे.तर निम गरवीशेती जी कणसे टाकत आहे ती व गरवी शेती जी पोटरी धरलेली भात शेती आहे तिच्या गाभात पाणी गेल्याने पुढे येणारी कणसे ही दाणे नसलेली म्हणजेच पलिंद पीक येणारी असल्याची दाट शक्यता आहे.असे शेतकरी लक्ष्मीप्रसाद पाटील यांनी सांगितले आहे. कृषी विभागाने शेतीची पाहणी करून योग्य ते उपाय सुचवण्याची मागणी तसेच शेतकऱ्यांना या संकटातून शासनाने सर्वतोपरी दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे