वसई: नायगाव पूर्वेच्या मालजीपाडा येथे मोबाईल चोरीच्या वादातून हॉटेल चालकांची हत्या झाल्याची घटना घडली. अजित यादव (२६) असे हॉटेल चालकाचे नाव आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
अजित यादव यांचा नायगाव पूर्वेच्या मालजीपाडा येथे यादव ढाबा आहे. याच ढाब्यावर रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास सात ते आठ जणांचा गट जेवणासाठी आला होता. याच दरम्यान मोबाईल चोरीच्या घटनेवरून हॉटेल चालक व ग्राहक यांच्यात वाद झाला.
या वादाचे पर्यावसन जोरदार हाणामारीत झाले. याच दरम्यान अजित यादव याच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारले. यात अजित यादव गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने विवान रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सोमवारी सकाळी अजित याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यानंतर नायगाव पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.यात सुनील सिंग (२५), प्रदीप यादव (२३), शिवम यादव (२०), कार्तिक साई कुनक (१९), सूरज पाल( २१), महेश यादव (२२) , राजन मौर्या (२२) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्या विरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंगळवारी त्यांना न्यायालया समोर हजर केले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.