भाईंदर: महावीर जयंती निमित्त रविवारी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मिरा भाईंदर महापालिकेने तर नागरिकांना अंधारात ठेवून ही बंदी लागू केल्याने रविवारी बाजारात गेलेल्या नागरिकांचा बंद दुकाने पाहून हिरमोड झाला. महावीर जयंतीनिमित्त रविवारी मिरा भाईंदर शहरातील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकांनी घेतला. मात्र याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. नागरिकांना अंधारात ठेवून केवळ मांस विक्रेत्यांना याबाबच्या सुचना देण्यात आल्या होत्या. परिणामी रविवारी बाजारात चिकन-मटण खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली. रविवार हा हक्काचा मांसाहारी दिवस. पण बंद दुकाने पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवड्यातील एक दिवस आम्हाला सुट्टी असते. त्यामुळे या दिवशी आमच्या घरी मांसाहारी जेवण बनते. मात्र आज मटन घेण्यासाठी घराबाहेर पडलेलो असताना ते कुठेच मिळाले नाही, असे चाणक्य आजगावकर या नागरिकाने सांगितले. मागील काही वर्षात येथे एका विशिष्ट्य समाजाचे लोक आल्यामुळे हे मांस बंदी सारखे निर्णय घेतले जात आहे.मात्र हा निर्णय नसून आमची संस्कृती हळूहळू संपवण्याचा कट आहे, असे प्रशांत पाटील या नागरिकाने सांगितले. एका विशिष्ट समाजाचा सण आहे म्हणून संपूर्ण शहरात मांस विक्रीवर बंदी ठेवणे उचित नाही. प्रत्येक सणानिमित्त महापालिका वेगवेगळे निर्णय घेईल का? असा सवाल पूजा सावंत या महिलेने केला. भाईंदर शहरात चिकन मटणची दुकाने बंद असली तरी मिरा रोडच्या मुस्लिम बहुल परिसरात मात्र दुकाने सुरूच असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: इंडिया मार्टवर ऑनलाईन हळद विकणे पडले महागात, ३५ टन हळद घेऊन ठकसेन फरार

शहरात जैन समाजाची वाढती संख्या पाहता यापूर्वी देखील मांस विक्री वरून अनेक संघर्ष उभे राहिले आहेत. पर्युषण काळात नेहमी वाद निर्माण होत असतो. यामुळे महापालिका सभागृहात आंदोलने करून मांस खाल्ल्याचा इतिहास आहे. मात्र प्रशासन एका विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून नेहमी मांसाहार बंदीचा निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात येतो.

हेही वाचा: नालासोपाऱ्यात गॅलरीचा स्लॅब कोसळला, एक जण जखमी; तीन जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

नागरिकांना अंधारात ठेवल्याची कबुली

राज्य शासनाच्या २००९ च्या शासननिर्णायानुसार चिकन मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या बंदीच्या निर्णयाबाबत नागरिकांना माहिती न दिल्याची कबुली महापालिकेतील पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागाने या निर्णयाची माहिती जनसंपर्क अधिकारी व इतर अन्य कोणत्याही विभागाला दिली नव्हती. त्यामुळे मांसबंदी बाबत नागरिकांना कोणतीही कल्पना मिळाली नसून प्रशासनामध्ये देखील मोठा संभ्रम पसरला होता, असे ते म्हणाले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mira bhaindar chicken mutton shops closed due to mahavir jayanti anger in mira bhaindar css