वसई: मंगळवारी भर रस्त्यात आरती यादवची हत्या करणार्‍या आरोपी रोहीत यादव याला वसईच्या सत्र न्यायालयाने २४ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नालासोपार्‍यात राहणार्‍या २० वर्षीय आरती यादव या तरूणीची तिचा प्रियकर रोहीत यादव याने मंगळवारी सकाळी भर रस्त्यात डोक्यात लोखंडी पाना घालून हत्या केली होती. या हत्येचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. वालीव पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करत आहे.

आता पर्यंत पोलिसांनी ८ जणांचे जबाब नोंदविले आहेत. आरतीने रोहीत बरोबर मागील ६ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तोडल्याने रोहीतने ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही याहत्यासंदर्भात पुरावे गोळा करत असल्याची माहिती वालीव पोलिसांनी दिली. बुधवारी दुपारी आरोपी रोहीत यादव याला वसईच्या प्रथमवर्ग दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले. तेथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्याविरोधात पोलिसांनी सत्र न्यायालयात पुर्निविलोकन अर्ज केल्यानंतर त्याला ६ दिवसांची २४ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

हेही वाचा : “…तर आरती यादव वाचली असती”, पोलिसांवर आरोप करत पीडितेच्या आई-बहिणीने फोडला टाहो

चित्रा वाघ, राजेंद्र गावित यांच्या भेटी

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि माजी खासदार राजेंद्र गावित यांनी मयत आरती यादवच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. चित्रा वाघ यांनी आचोळे पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आठवड्यापूर्वी आरतीने रोहीत विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यांचे काम योग्यरितीने केले होते असे वाघ यांनी सांगितले. मात्र जमाव पुढे आला असता तर आरतीचा जीव वाचला असता असेही त्यांनी सांगितले.