वसई:- वसई पूर्वेतील वालीव परिसरात तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे याठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वसई पूर्वेच्या भागात वालीव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत आजूबाजूच्या भागातील नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी येत असतात. पण गेल्या काही काळात महापालिका प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्मशानभूमीच्या दुरुस्ती कडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमीच्या भिंतींना तडे गेले आहेत तर बहुतांश ठिकाणी छताचा स्लॅब कोसळला आहे. तर काही ठिकाणी भिंतीचे प्लास्टर निखळून पडले आहे.
स्मशानभूमीच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने ती कमकुवत झाली, असून यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अंत्यविधी करण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या साहित्याची अवस्था बिकट झाली आहे. तसेच स्मशानभूमीच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. या स्मशानभूमीच्या अशा स्थितीमुळे या भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी येण्यास ही नागरिकांना अडचणीचे ठरत असल्याचे मनसेचे जयेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
स्मशानभूमीत योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करणे वेळोवेळी त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता पालिकेला याकडे लक्ष देण्यास ही वेळ नाही असे नागरिकांनी सांगितले आहे. यासंबंधी महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली असता. त्यांनी स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी निविदा काढण्याचे निर्देश दिल्याचेही नागरिकांनी सांगितले.