मागील काही महिन्यांपासून वसई विरार व मिरा भाईंदर भागात अवैध व्यवसायांवर छापेमारी करीत पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या आहेत. यात विशेषतः अमली पदार्थांची तस्करी, हातभट्ट्यांवरील कारवाई, रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या बारवर धाड टाकणे, अवैध देह व्यापाराला आळा घालणे, अशा कारवायांचा समावेश आहे. अशा मोठं मोठ्या कारवाया करीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र असे जरी असले तरीही या कारवाया अधिक तीव्र करून त्यांचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वस्त घरांसाठी देशभरातील नागरिक इथे स्थलांतर करत असतात. वाढत्या घरांच्या मागणीसाठी शहरात एकीकडे अनधिकृत बांधकामांची संख्या वाढलेली आहे. हीच अनधिकृत बांधकामे आता बेकायदेशीर व्यवसायासाठीची केंद्र ठरू लागली आहेत. नुकताच मुंबई पोलिसांच्या पथकाने नालासोपारा पेल्हार येथील एका अनधिकृत पणे उभारलेल्या गाळ्यात चक्क अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना चालविला जात असल्याचा प्रकार उघड केला होता. यापूर्वी सुद्धा कामण मध्ये अशाच प्रकारे अनधिकृत गाळ्यात अमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त केला होता. त्यामुळे उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामे आता अमली तयार करणारे अड्डे तयार होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
अनधिकृत बांधकामामुळे शहरात दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांची संख्या ही वाढते आहे. विशेषतः विदेशी नागरिक ही शहरात दाखल होत आहे.
मागील काही वर्षात नायजेरियन आणि बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीर पणे घुसखोरी केली आहे. बहुतांश प्रकरणात याच विदेशी नागरिकांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सगळ्यामुळे शहरात अवैध व्यवसाय फोफावल्याचे दिसून येत आहे. यात सगळ्यात मोठे आव्हान आहे ते अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे. कारण पाकिस्तान, नेपाळ यासह अन्य विदेशातून ही भारतात तस्करी होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले होते. शहरात अमली पदार्थ विक्रीच्या घटना वाढत असून कॅफे हॉटेलपासून ते थेट शाळा महाविद्यालयाच्या परिसरात अमली पदार्थ विक्रीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.
अमली पदार्थ खरेदी विक्री पर्यंत सीमित न राहता आता घरात ही त्यांचे कारखाने उभारून अमली पदार्थ तयार करून त्यांचा विविध ठिकाणी पुरवठा होऊ लागला आहे.
मुंबई पोलिसांनी थेट वसईत धाड टाकून १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. अगदी पेल्हार पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर कारखाना सुरू असताना स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.जर पोलीसच अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असतील तर अशा गैर प्रकारांना आळा बसेल तरी कसा असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. यापूर्वी गुन्हे शाखेने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तेलंगणा राज्यातील कारखान्यावर केलेल्या कारवाईत कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यंदाच्या चालू वर्षात ७९ कोटीं ४३ लाखांचे जप्त करत ३२७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात विशेषतः अमली पदार्थामध्ये अफू, गांजा, कोकेन, एमडी ( मेफेड्रोन) अशा अमली पदार्थांचा समावेश असून यांच्या किंमती कोट्यावधी रुपयांच्या घरात आहेत.
दुसरीकडे शहरात बार आणि कॅफे संस्कृतीही वाढताना दिसते आहे. या बार चालकांकडून वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने अनेकदा मध्यरात्रीपर्यंत बार सुरूच असल्याचे दिसून येत असते. मात्र शहरातील वाढलेली बारची संख्या लक्षात घेता ही कारवाई आणखीन तीव्र करण्याची गरज आहे.
त्यात मागील काही महिन्यापासून पोलिसांकडून गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे मारले असून याबाबत कारवाई सुरूच आहे. यामुळे अवैध हातभट्टी चालवणाऱ्यांवर तूर्तास तरी चाप बसल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर भेसळयुक्त ताडी विक्रीचा प्रश्नही गंभीर आहे. अनेकदा या ताडी केंद्रांमधून नैसर्गिक ताडी असल्याचा दावा करून भेसळयुक्त ताडीची हजारो लीटर विक्री केली जाते. वसई विरार शहरात अशा केंद्रांची संख्या मोठी आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या केंद्रावरील कारवाई ही अपुरी पडत असल्याचे चित्र असून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
सध्या शहरात अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे यामुळे अवैध व्यवसायांना काही प्रमाणात चाप बसणार आहे. मात्र अमली पदार्थांची विक्री थांबविणे यासह सर्वच अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आव्हान प्रशासनासह पोलिसां समोर आहे.
तरुणाई व्यसनाधीनतेच्या अधीन
अवैध व्यवसायांमुळे शहरात व्यसनाधीनता वाढत असून याचा थेट परिणाम शहरातील तरुणाईवर होताना दिसत आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयांच्या परिसरातही अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या. शहराच्या पश्चिम भागात असणारे समुद्रकिनारे हे देखील अनेकदा अवैध व्यवसायांचे अड्डे होत जातात. समुद्रकिनाऱ्यांवर तरुणाईची सर्वाधिक गर्दी होत असते अशा वेळी इथे अमली पदार्थही सहज उपलब्ध होत असतात. व्यसनांमुळे तरुणाईमध्ये मानसिक संतुलन बिघडणे आणि आत्महत्यांसह इतर समस्या वाढत आहेत. काही तरुण नशा करण्यासाठी चोऱ्या माऱ्या असे प्रकार ही करू लागले आहेत. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात ही समस्या गंभीर होऊ शकते.
नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज
शहरात अनेकदा संबंधित विभागांकडून अशा अवैध व्यवसायांवर वेळीच कारवाई केली जात नाही आणि याचा परिणाम दीर्घकाळ सामान्य माणसांना भोगावा लागतो. अशावेळी ठराविक काळानंतर छापेमारी करून थेट कारवाई करण्याची गरज आहे. शहराची लोकसंख्या पाहता अशा अवैध व्यवसायांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये सातत्य असण्याची गरज आहे. तसेच अधिकृत असणाऱ्या व्यवसायांवरही नियमांचे कठोर बंधन असायला हवे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी तरच शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहण्यास मदत होणार आहे.
