वसई:- वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. नुकतेच पालिकेने काही ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या चार दिवसातच रस्त्यावरील डांबराचा मुलामा निघून गेला आहे.

वसई विरार शहरात यंदा झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना ही समोर येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे रिक्षाचालक व दुचाकीस्वार यांना या खड्ड्यांमुळे आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सणासुदीच्या काळात तरी रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल अशी आशा नागरिकांना होती.मात्र तेव्हा पावसाचा कालावधी लांबल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्याचे कारण देत पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती केली नव्हती.

या रस्त्यांच्या दुरुस्ती व प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी आठ प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण यासाठी ५५ कोटी ७९ लाख तर इतर शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६८ कोटी २७ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्याबाबत निविदा काढून रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यानुसार वसई विरार शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी करण्यात येत असलेले डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून अवघ्या चार दिवसातच रस्ते उखडले आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन, नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव, नायगाव पूर्व, विरार यासह विविध ठिकाणच्या भागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पावसाळा थांबताच महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ठेकेदाराकडून डांबरीकरण आणि खडीकरणाच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले जात आहेत. मात्र, रस्तेदुरुस्तीच्या अवघ्या काही दिवसातच डांबरीकरण नाहीसे होऊन रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू लागल्यामुळे नागरिकांकडून ठेकेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची रस्तेदुरुस्ती करून वेळ वाया घालवला जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

ठेकेदारांना सूचना

रस्ते दुरुस्तीच्या संदर्भात निविदा काढून कामाचा ठेका ही देण्यात आला आहे. त्यानुसार शहरात रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. ती कामे दर्जेदार असावी यासाठी ठेकेदार, विभागीय बांधकाम अभियंते यासह अन्य अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे. त्यांना या बैठकीत सूचना करून कामे चांगल्याप्रकारे पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ज्यांनी निकृष्ट दर्जाची कामे केली असतील त्यांच्या कामाची तपासणी करून त्यावर कारवाई केली जाईल असे महापालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे.