वसई:- वसई विरार शहरात अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहिम आखली आहे. याच पार्श्वभूमीवर मांडवी पोलिसांनी पारोळ आणि खार्डी कोशिंबे येथील जंगलात धाडी टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. यात हजारो लीटर दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

वसई विरार शहरात अमली पदार्थ तस्करी, अवैध दारू विक्री, गावठी हातभट्ट्या चालविणे असे प्रकार वाढत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी वसई विरार – मिरा भाईंदर पोलीस आयुक्तांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विविध ठिकाणी छुप्या मार्गाने जंगल भागात गावठी दारूच्या हातभट्ट्या लावल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पारोळ येथील जंगलात व खार्डी कोशिंबे येथील जंगलात छापा टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करून हजारो लीटर मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. यात दोन जणांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ) (ब) (ई) प्रमाणे मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बलराम पालकर, बालाजी मुसळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

पथके नियुक्त

वसई विरार शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने जंगल परिसर व कांदळवन भागात दारूच्या हात भट्ट्या लावल्या जात आहेत. अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली असून यापूर्वी पाणजू बेट व मालजीपाडा येथील कांदळवन भागात छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या होत्या. यात ३० लाखांचा मुद्देमाल नष्ट केला होता.