भाईंदर : मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य रस्त्यावरील काशिमीरा ते गोल्डन नेस्ट मार्ग सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एमएमआरडीएने प्रस्ताव तयार केला असून जवळपास तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित केला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील गोल्डन नेस्ट ते काशिमीरा या मुख्य मार्गांवर मेट्रो मार्गिका आणि उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. सुमारे साडेचार किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे, तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा फटका वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. विशेषतः रहदारीच्या वेळेत येथे मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते.
या दुरवस्थेमुळे नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींवर टीका केली जात आहे. परिणामी, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, निधीअभावी हे काम प्रत्यक्षात राबवणे कठीण असल्याने, हे काम शासनामार्फत व्हावे, असा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवला होता.यास शासनाने मंजुरी देत हे काम एमएमआरडीए मार्फत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नुकताच या रस्त्याच्या उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या तीनशे कोटी खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. तर येत्या डिसेंबर पासून प्रत्यक्ष या हे काम सुरू होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
नव्याने पादचारी पूल :
मिरा भाईंदर शहराच्या मुख्यमार्गाचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर या मार्गांवर चार ठिकाणी पाद चारी पूल उभारले जाणार आहे. यामुळे भविष्यात रस्ता उलटताना अपघात होणे म्हणून ही खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.