वसई: वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे.  शासनाने ही २९ गावे पालिकेतच राहतील असे स्पष्ट केले आहे. बुधवारी याबाबत नगरविकास विभागाकडून अधिसचूना काढण्यात आली.

२००९ साली तत्कालीन ४ नगरपरिषदा आणि ५५ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून वसई विरार शहर महापालिकेची स्थापना करण्यात आली होती. मात्र २९ गावांनी महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध केला होता. याविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात आले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ३१ मे २०११ साली वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र या शासन निर्णयाला वसई विरार महाालिकेने याचिका दाखल करून आव्हान देत स्थगिती मिळवली होती. तेव्हापासून गावे वगळण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते.

दरम्यान, राज्य शासनाने गावे वगळण्याचा ३१ मे २०११ चा शासन निर्णय रद्द केला आणि १४ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्य शासनाने २९ गावे महापालिकेतच समाविष्ट करत असल्याची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली. राज्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी यासंदर्भातील रिट याचिका (४४२०) आणि इतर संलग्न याचिका रद्द करण्याची विनंती महापालिकेला केली होती. त्यानुसार  उच्च न्यायालयाने यापूर्वीची पालिकेची स्थगिती याचिका बरखास्त केल्या आहेत. या अधिसूचनेवर संबंधित २९ गावांमधील ग्रामस्थांकडून लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या ग्रामीण भागात राहायचे की पालिकेत राहायचे या संदर्भात ३१ हजार ३८९ ग्रामस्थांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर केले होते. त्यावर हरकती व सुनावणी झाल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी १७ मार्च २०२५ ला अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याच अनुषंगाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने  अधिसूचना प्रसिद्ध करून ही २९ गावे महापालिकेतच राहतील असे स्पष्ट केले आहे. याशिवाय त्यांची नव्याने हद्दी निश्चिंत केल्या जातील असेही त्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

नवीन अधिसूचनेनुसार २९ गावांचा वसई विरार महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गेल्या १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटला आहे. हा २९ गावे वसई विरार महापालिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

ही २९ गावे पालिकेतच…

आगाशी, कोफराड, बापाणे, ससुनवघर, भुईगाव बुद्रुक, भुईगाव खुर्द, गास, गिरीज, कौलार बुद्रुक, कौलार खुर्द, नवाळे, निर्मळ, वाघोली, दहिसर, नाळे, राजोडी, वटार, चांदीप, काशीद कोपर, कसराळी, कोशिंबे, चिंचोटी, देवदळ, कामण, कणेर, कोल्ही, मांडवी, शिरसाड आणि सालोली आदी महसूल गावांच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.