भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ११३ कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे. विशेष सवलत योजनेचा लाभ घेत १ लाख ७७ हजार मालमत्ता धारकांनी आपला कर भरला असून, त्यात सर्वाधिक ९७ हजार जणांनी ऑनलाईन पद्धतीने ६३.६६ कोटी रुपये जमा केले आहेत
मिरा-भाईंदर मध्ये व्यावसायिक आणि निवासी असे सुमारे चार लाख मालमत्ता धारक आहेत. यातील काही मालमत्ता धारक वेळेवर कर भरणा करतात. तर,उर्वरित अधिकतर मालमत्ता धारक कर भरणा करण्याकडे पाठ फिरवतात.
परिणामी आर्थिक वर्षा अखेरीस म्हणजेच मार्च मध्ये अपेक्षित उत्पन्न प्राप्त करण्यात अडथळे येतात. याचा थेट परिणाम विकास कामांवर झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे कर वसुली करण्यासाठी दरवर्षी पालिकेला मोठी कसरत करावी लागते.
ही बाब लक्षात घेऊन, मिरा-भाईंदर पालिका प्रशासनाने मागील तीन वर्षांपासून मुदतीत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना दिलासा व कमी कालावधीत अधिक कर वसुलीच्या उद्देशाने सवलत योजना लागू केली जात आहे. याचा चांगला परिणाम कर वसुलीवर पाहायला मिळाला आहे. त्यामुळे यंदाही जून अखेरीस पर्यंत पाच टक्के तर जुलै अखेरीस पर्यंत तीन टक्के अशी सवलत पालिकेकडून जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा फायदा घेत अद्याप पर्यत १ लाख ७७ हजार मालमत्ता धारकांनी ११३ कोटींचा कर भरणा केला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
ऑनलाईन कर भरणा सर्वाधिक
मिरा भाईंदर महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यामुळे यंदाचा वर्षी ९७ हजार मालमत्ता धारकांनी ६३ कोटी ६६ लाख रुपयांचा ऑनलाईन कर भरणा केला आहे. तर, रोख स्वरूपात ७९ हजार मालमत्ता धारकांनी ४९ कोटींचा कर भरला आहे.