भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे अनेक आजार होत असल्याने, अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार, राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून, पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर तसेच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई सुरू केली आहे. यामुळे राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला आहे.याच धर्तीवर, मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच कबुतरांच्या रक्षणासाठी दोन गट पुढे सरसावले आहेत.
विशेषतः मिरा भाईंदर शहरात कबुतरांना दाणे टाकण्यासाठी भाईंदरमधील जेसल पार्क चौपाटीवर कबुतरखाना उभारण्यात आला आहे. याशिवाय मिरा रोड व भाईंदरमधील अनेक चौकांत कबुतरांना दाणे टाकले जातात. शहरात जैन समाजाची संख्या अधिक असल्यामुळे, धार्मिक भावनेतून ही सेवा दिली जाते. मात्र, या कबुतरांमुळे होणारा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे गेल्या अनेक वर्षांपासून दाखल होत आहेत. वर्षभरापूर्वीच चौपाटी येथील कबुतरखाना बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. मात्र, त्याला होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे प्रशासनाने वेळोवेळी या विषयाकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, मुंबईत कबुतरखान्यांवर शासनाने कारवाई सुरू केल्यामुळे, त्याच धर्तीवर मिरा भाईंदर शहरातही कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून कबुतरखान्यांवर कारवाई करण्याची तयारी लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला आवश्यक सूचना दिल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत कबुतरांच्या प्रश्नावरून मिरा भाईंदरमधील वातावरण पेटून उठण्याची शक्यता आहे.
“आम्ही पशुसेवा म्हणून कबुतरांना दाणे देतो. इतकी वर्षे दाणे दिल्यानंतर याचा त्रास कुणालाही झालेला नाही. आजपर्यंत प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. जर कारवाईचा विचार केला असेल, तर त्याला विरोध नक्कीच करू.” नरेंद्र गुप्ता – जेसल पार्क चौपाटी कल्याण समिती