भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलाखाली उद्यान उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत नुकताच प्रशासकीय ठराव करण्यात आला असून,१८ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

काशिमीरा ते गोल्डन चौक या मुख्य मार्गावर एमएमआरडीएतर्फे तीन उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी दोन पूल वापरासाठी खुले करण्यात आले असून, एका पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेल्या पुलाखालील मार्ग मोकळा करून तो महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे.

मात्र काही दिवसांपासून या पुलाखाली बेघर नागरिकांनी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरू लागले असून, भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भागात उद्यानाची उभारणी करून ते नागरिकांसाठी खुलं करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

१८ कोटींचा खर्च

दोन उड्डाणपुलाखाली उभारण्यात येणाऱ्या उद्यानासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. यातील ७० टक्के खर्च शासन अनुदानातून आणि उर्वरित ३० टक्के खर्च महापालिका निधीतून करण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एन. के. ब्रदर्स या संस्थेची निवड करण्यात आल्याचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले.