भाईंदर – मिरा-भाईंदर शहरातील खड्ड्यांची तक्रार थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेने नागरिकांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमार्फत नोंदवण्यात येणाऱ्या तक्रारीवर त्वरित कारवाई करून खड्डे भरले जातील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेचा कारभार डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद शक्य झाल्याचे सांगितले जाते. याच दिशेने गेल्या वर्षभरात प्रशासनाचे संपूर्ण कामकाज डिजिटल करण्यासाठी पावले देखील उचलली आहेत. यामध्ये भर म्हणून नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि चॅटबॉट यांसारख्या सुविधा देखील प्रशासनाकडून अद्ययावत करण्यात आल्या आहेत.
त्यावरून यंदा पहिल्यांदाच खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी डिजिटल सोय करण्यात आली आहे. ज्या परिसरात खड्ड्यांचा त्रास आहे, त्या ठिकाणची माहिती आणि फोटो डिजिटल माध्यमांतून पाठवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या माध्यमांतून आलेल्या तक्रारी थेट सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असून, अवघ्या २४ तासांत खड्डे भरण्याचा संकल्प प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय खड्ड्यांची माहिती देण्यासाठी १८०० २२४८४९ हा टोल-फ्री क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
मिरा-भाईंदर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र आहे. विशेषतः पावसाच्या आगमनानंतर शहराचे सर्वेक्षण करून खड्डे तात्काळ भरले पाहिजेत. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असूनही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी खड्डे भरले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी केली आहे.