भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील सलून आणि औद्योगिक वसाहतींमधून निर्माण होणाऱ्या धारदार ब्लेडवर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्प स्थळी ‘प्लाझ्मा टेक्नॉलॉजी’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, असा प्रकल्प उभारणारी ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा करण्यात येत आहे.

शहरात सध्या एक हजाराहून अधिक सलून दुकाने असून, तितक्याच महिला ब्युटी पार्लरची संख्या आहे. या सर्व ठिकाणांहून दररोज मोठ्या प्रमाणात टाकाऊ ब्लेड निघतात. शासनाच्या नियमानुसार सलून आणि ब्युटी पार्लरमधून निघणाऱ्या धारदार ब्लेडच्या सुरक्षित विल्हेवाटासाठी  स्वतंत्र नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार वापरलेले ब्लेड पंचर-प्रूफ ‘शार्प्स कंटेनर ‘मध्ये जमा करून त्यांची सुरक्षित विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

मात्र प्रत्यक्षात अनेक सलूनधारक वापरलेले ब्लेड नाल्यात, गटारात किंवा सामान्य घनकचऱ्यात मिसळून देतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरा गोळा करताना वारंवार दुखापती होतात. झोपडपट्टी भागात ही समस्या अधिक गंभीर असून, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.

शहरातील ब्लेड कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर प्रशासनाने यावर तोडगा काढत उत्तन येथील घनकचरा प्रकल्प स्थळी ‘प्लाझ्मा टेक्नॉलॉजी प्रकल्प’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे असून, कंत्राटदार निवड अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त  सचिन बांगर यांनी दिली आहे.

 प्लाझ्मा टेक्नॉलॉजी प्रकल्प म्हणजे काय?

प्लाझ्मा टेक्नॉलॉजी ही कचऱ्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक पद्धत आहे. या प्रक्रियेत अत्यंत उच्च तापमानावर अविघटनशील कचरा वितळवला जातो. या उष्णतेच्या प्लाझ्माच्या सहाय्याने घनकचरा, वैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा यांसारख्या धोकादायक पदार्थांचा पूर्णतः नाश केला जातो. या प्रक्रियेदरम्यान प्रदूषण निर्माण होत नाही, तसेच निर्माण झालेली ऊर्जा पुन्हा वापरता येते.