लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: विरारमधील पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी (७५) यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा २ दिवसांनी खाकराणी यांचा वाहन चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. आरोपी नेपाळ येथे पळून गेल्याने १६ दिवस पोलिसांना चकमा देत होते.

उल्हासनगर येथे राहणारे रामचंद्र खाकराणी (७५) यांचा विरारच्या चंदनसार येथे पेट्रोल पंप आहे. रविवार २५ ऑगस्ट ते नेहमी प्रमाणे विरार च्या पेट्रोल पंपावर आले होते. रात्री ते आपल्या गाडीतून (एमएच ०४ एफजी ०५५) चालक मुकेश खुबचंदांनी (५४) याच्यासोबत घरी जाण्यासाठी निघाले होते.. मात्र दुसऱ्या दिवशी खाकराणी यांचा मृतदेह मुंबई अमहदाबाद महामार्गावरील कामण गावाच्या जवळ असलेल्या नागले गावात गाडीत आढळला होता. त्यांच्या कडील ५ लाखांचे घड्याळ, १० लाखांची अंगठी आणि ७० हजार रुपये रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले होते.

आणखी वाचा-कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट

१६ दिवस आरोपींच्या मागावर

खाकराणी यांची हत्या चालक मुकेश खुबचंदांनी (५४) याने आपल्या दोन साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र हत्या करून ते गुजराथ, उत्तर प्रदेश मार्गे नेपाळला फरार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे कक्ष २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. आरोपी नेपाळ मध्ये असल्याने त्यांचा माग काढणे कठीण बनले होते. दरम्यान, आरोपी चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी गोरखपूर येथे येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना मिळाली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने मुकेश खुबचंदांनी (५४) आणि अनिला राजकुमार उर्फ थापा (३२) या दोघांना अटक केली. तिसरा आरोपी रामलाल यादव (२२) हा फरार झाला. पोलिसांनी आरोपींकडून अंगठी, घड्याळ आणि १७ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, मध्यवर्थी गुन्ह शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या पथकाने ही कारवाई करून आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले.

आणखी वाचा-वसई: अडीच वर्षात सहा हजार वीज चोऱ्या ५० कोटींची वीज चोरी

एक महिन्यांपूर्वी रचला होता कट

आरोपी मुकेश खुबचंदानी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीसह सहा गंभीर गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यांची नोंद आहे. तो सहा महिन्यांपूर्वीच खाकराणी यांच्याकडे कामाला लागला होता. तुरूंगात असताना त्याची ओळख नेपाळचा रहिवाशी असलेल्या अनिल थापा आणि रामलाल यादव याच्याशी झाली होती. एकदा ते नेपाळच्या लुंबिनी येथे फिरायला गेले असताना खुबचंदानी याने चोरीची योजना सांगितली आणि मग कट रचला.

अशी केली हत्या

२५ ऑगस्ट रोजी रामचंद्र खाकराणी हे विरार मधील पेट्रोलपंपावर आले होते. संध्याकाळी ४ वाजता ते चालक मुकेशसह उल्हासनगर येथील घरी जायला निघाले. वाटेत ठरल्या योजनेनुसार मुकेशचे साथीदार अनिल थापा आणि रामलाल यादव हे मांडवी येथे गाडीत चढले. गाडीत त्यांनी गळा दाबून खाकराणी यांची हत्या केली आणि त्यांचे तोंड बांधून गाडीत मृतदेह टाकून पसार झाले. मुकेशने आपल्या मोबाईलमधी सीम कार्ड काढून फेकले होते. आपण नेपाळला गेल्यावर पकडले जाणार नाही, याची त्यांना खात्री होती. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढत अटक केली.