वसई: वसई विरार शहरात एकामागून एक चोरीच्या घटना समोर येत आहे. घरात तसेच दुकानात शिरून दिवसाढवळ्या चोरटे मौल्यवान वस्तू गायब करत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच एका सराफाच्या दुकानात भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
नायगाव पूर्वेच्या रश्मी फेज येथे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात १५ नोव्हेंबर रोजी भिंतीला भगदाड पाडून आत शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी उघडत असताना जोरात सायरन वाजला त्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सराफाने दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी मिळाली माहितीच्या आधारे नायगाव पोलिसांनी तपास करून तीन जणांना अटक केली आहे. यात विजय बन्सराज यादव (२५) अमोल देवसीचाई गोहील (३२) सचिन मेघराज सिंग (३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल गोहिल या आरोपीवर बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम, सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, चेतन ठाकरे, सचिन खंताळ, जयवंत खंडची, अशोक पाटील, अमोल बरडे व त्यांच्या पथकाने केली आहे.
सायरनमुळे अनर्थ टळला
तिघे आरोपी ही गॅस कटर व अन्य साहित्य घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र सराफाने आपल्या दागिन्यांच्या दुकानात आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट मिळण्यासाठी सायरन बसविला आहे. त्यामुळे तिजोरी उघडत असताना जोर जोराने सायरन वाजू लागला. त्यामुळे तेथून चोरट्यांनी पळ काढला. दुकानदाराला याची माहिती मिळताच त्याने ११२ या क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना माहिती दिली. दुकानात लाखोचा मुद्देमाल होता जर सायरन वाजला नसता तर मोठी घरफोडी झाली असती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.
सराफा दुकानदारांना सायरन बसविण्याचे आवाहन
वसई विरार भागात अनेकदा दागिन्यांची दुकाने फोडून चोरी करण्याच्या घटना समोर येत असतात. आतापर्यंत घडलेल्या बहुतांश घटनांमध्ये लाखोंचा मुद्देमाल चोरी झाला आहे. अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी सराफा दुकानांच्या बाह्य सुरक्षेसोबतच जर सायरनसारखी यंत्रणा बसविली तर घडणाऱ्या अनुचित प्रकाराला आळा घालता येणार आहे.
