वसई: मिरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरातील तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाकडून एक दिशा मार्गिका (one way) धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, शहरातील अंतर्गत रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून काशीमीरा वाहतूक विभाग परिमंडळ – १ आणि विरार वाहतूक विभाग परिमंडळ – ३ यांच्याकडून शहरात प्रायोगिक तत्त्वावर एक दिशा मार्गिका (One Way) धोरण राबविण्यात येत आहे.
३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान शहरात हे धोरण लागू करण्यात आले असून विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनचालकावर महाराष्ट्र राज्य पोलीस कायदा कलम १३१ व मोटार वाहन कायदा कलम १७९ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
काशिमीराहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बदल
प्रवेश बंद मार्ग:
भक्ति वेदांत हॉस्पिटल ते पेणकरपाडा मार्ग
दालमिया कॉलेज कॉर्नर ते पेणकरपाडा मार्ग
भोईर सीएनजी पंपासमोरून पांडुरंग वाडी मार्ग
पेणकरपाडा रोडवरून दहिसर चेक नाका पोलिस चौकी मागील प्रवेश
अजित पॅलेस हॉटेलकडून नॉर्थ बाऊंड सर्व्हिस रोडवर उजव्या वळणासाठी प्रवेश
लोढा कॉम्प्लेक्स (पांडुरंग वाडी सिग्नलजवळ) येथून महामार्गावर उजव्या वळणासाठी प्रवेश
मिरा गावठाणातील डेल्टा गार्डन बिल्डिंगजवळून महामार्गावर उजव्या वळणासाठी प्रवेश
पर्यायी मार्ग
सर्व बंद मार्गावरील वाहने अमर पॅलेस हॉटेल समोरील ब्रिजखालील वळणावरून यु-टर्न घेऊन मुंबई दिशेने पुढे जावे लागणार आहे.
विरारमधील अंतर्गत वाहतुकीतील बदल
प्रवेश बंद मार्ग:
वर्तक चौक ते जुने विरार पोलीस ठाणे (महानगरपालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता)
मजेठिया नाका ते टोटाळे तलाव (वाचनालयाकडे जाणारा मार्ग)
पर्यायी मार्ग:
मजेठिया नाका व सबवे नाका येथून येणारी वाहने मच्छी मार्केट – बी.के. वर्तक चौकमार्गे बाहेर पडतील.
टोटाळे तलाव वाचनालय येथून मजेठिया नाका (बस स्टँड समोरून) मार्गे वाहने बाहेर पडतील.
