लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईंदर: मुंबईत दहिहंडी बघून एकाच दुचाकीवर घरी परतणार्‍या तीन तरुणांचा अज्ञात वाहनाने घडक दिल्याने अपघात झाला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जखमी झाले आहेत. हे तिघे तरुण विरार मध्ये रहात होते.

विरारच्या मनवेल पाडा येथील गितांजली निवास या चाळीत राहणारे गणेश कामत (२१) यतीन साटम आणि रितेश सिंग हे तीन तरुण गुरूवारी मुंबईला दहीहंडी बघण्यासाठी गेले होते. संध्याकाळी ते तिघे एकाच दुचाकीवरून घरी परतत होते. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाराज धाबा समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा… वसई, विरारमध्ये ‘एक सोसायटी, एक गणपती’ ; प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा अनोखा उपक्रम

मात्र उपचारादरम्यान गणेश कामत (२१) याचा मृत्यू झाला. तिघे एकाच दुचाकीवरून जात होते, या प्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोेंद केली आहे अशी माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक पाटील यांनी दिली आहे. जखमी यतीनवर ऑर्बिट रुग्णालयात तर रितेश सिंग याच्यावर विरारच्या संजिवनी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर मनवेल पाडा येथील सिध्दीविनायक चाळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One youth died and two others were injured in an accident on mumbai ahmedabad highway dvr