वसई:वसईच्या माणिकपूर येथे वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सोमवारी रात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. या आगीमुळे येथील रोहित्र बंद पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे. दुर्घटनेनंतर १७ तास उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने विजेविना नागरिकांचे हाल झाले आहेत.
वसई पश्चिमेच्या माणिकपूर मार्केट जवळ आजूबाजूच्या परिसरात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसविले आहे. सोमवारी रात्री अचानकपणे या रोहित्राला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली होती.
स्थानिकांनी याची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. ऑइल गळतीमुळे तांत्रिक बिघाड होऊन ही घटना घडली आहे.
या आगीमुळे रोहित्र बंद पडल्याने माणिकपूर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. साधारपणे पाचशेहून अधिक वीज ग्राहक बाधित झाले होते. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
महावितरणकडून नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरू असून १७ तास उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
माणिकपूर मध्ये रोहित्र बदलण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे दुर्घटना
वसईच्या माणिकपूर येथील विद्युत विभागाच्या रोहित्रा मधून अनेक दिवसांपासून ऑइलची गळती होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी विद्युत विभागाचे अधिकारी यांना दिली होती. याकडे अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप रॉबिन मिनेझिस यांनी केला आहे. हे रोहित्र अगदी नागरी वस्तीजवळ असून तेथे लहान मुलं खेळत असतात. तर नागरिकांची रहदारी असते. यासाठी रोहित्र अन्य ठिकाणी हलविण्यात यावे अशी मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.