वसई : वसई-विरार शहरातील बाजारपेठांमध्ये यंदा तुळशीच्या लग्नाआधीच मोठ्या प्रमाणात ऊस दाखल झाला आहे. २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छठ पूजेनिमित्त उसाला मोठी मागणी असल्याने शहरात त्याची आवक वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्यामुळे उसाच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे.
वसई-विरार शहरात यंदा मोठ्या उत्साहात छठ पूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी समुद्र, तलाव, नदीकिनारे येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा केली जाते. या छठ उत्सवात उसाला अत्यंत विशेष स्थान आहे. तो मुख्य नैवेद्यांपैकी एक म्हणून देवीला अर्पण केला जातो. छठ पूजेच्या वेळी, घराच्या अंगणात उसाच्या पानांचा वापर करून छत्रीसारखी रचना किंवा मंडप तयार केला जातो आणि विधीवत पूजा केली जाते.
पौराणिक समजुतीनुसार, उसापासून बनवलेली हा मंडप छठी देवीला खूप प्रिय आहे आणि यामुळे देवी प्रसन्न होऊन घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. ऊस ही एक कठोर आणि पवित्र वनस्पती मानली जाते, ज्याला प्राणी किंवा पक्षी स्पर्श करत नाहीत. या पवित्रतेमुळेच ऊस छठी देवीला प्रिय असल्याचे मानले जाते.
एरवी रसवंती गृहात किंवा देव दिवाळीच्या वेळी बाजारात दिसणारा ऊस छठ पूजेमुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. मात्र, छठ पूजेमुळे वाढलेली मागणी लक्षात घेता उसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एरवी साधारणपणे २० ते ३० रुपयांना विकल्या जाणाऱ्या उसाच्या कांडीचा दर ६० -७० रुपयांवर पोहोचला आहे.
ग्रामीण भागात ऊस सहज उपलब्ध होत असला तरी, शहरी भागात तो खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. उसाचा एक तुकडा १० रुपयाने तर लहान तुकडे केलेल्या ऊसाचे एक पाकीट २० रुपयांनी विकले जात आहे. तसेच छठ पूजा जवळ आल्याने येत्या काही तासांत उसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
