विरार : Varsova-Chinchoti Route Traffic मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील वर्सोवा पूल ते चिंचोटी मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या आता गंभीर झाली आहे. रविवारी या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांनी वसई-भाईंदर रो रो सेवेचा पर्याय निवडला. मात्र यामुळे रो रो सेवेवरील ताण वाढून वसई किल्य्यातील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील वर्सोवा ते चिंचोटी मार्गावर तसेच अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. ठाणे- घोडबंदर मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीसाठी हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रविवारी सकाळपासूनच वर्सोवा पूल ते चिंचोटी या दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. तसचे रविवारी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घोडबंदर मार्गावर एक अवजड वाहन रत्यावरच उलटल्याने सकाळपासून या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावरील नवघर ते काजूपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांनी वसईतून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी रो रो सेवेचा पर्याय निवडला. मात्र यामुळे या सेवेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊन वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. यामुळे रो रोच्या कर्मचाऱ्यांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

वसई किल्ल्यात वाहनांच्या वर्दळीत वाढ

रो रो सेवेसाठीचा रस्ता वसई किल्ल्यातून जात असल्याने वसई किल्ला परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. रविवारी जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. वसई किल्ला परिसरात अनेक वसईकर चालण्यासाठी आणि धावण्यासाठी येत असतात मात्र वाहनांच्या वर्दळीत वाढ झाल्याने या मार्गावरून चालणे, धावणे आणि व्यायाम करणे अवघड झाले आहे. पूर्वी या परिसरात वाहनांची संख्या कमी होती. मात्र रो रो सेवेमुळे या मार्गवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून यामुळे या मार्गावर चालणे अवघड झाले आहे असे वसईतील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.

रो रो सेवा अपुरीच

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांकडून रो रो सेवांचा वापर केला जातो. वसई विरार शहरात वसई ते भाईंदर आणि विरार ते जलसार अशा दोन मार्गांवर रो रो सेवा पुरविण्यात येते. मागील काही महिन्यांपासून रो रो सेवेला वाहनचालकांची पसंती मिळत असून यामुळे अनेकदा या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. सध्या रो रो सेवेच्या फेऱ्या मर्यादित असून या सेवेवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे अनेकदा वाहनचालकांना काही कालावधी थांबून राहावे लागते. तसेच अनेकदा फेरीबोटीतून अतिरिक्त क्षमेतेने वाहतूक करण्यात येते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या मार्गांवर सर्वाधिक गर्दी होत असते. यामुळे रो रो सेवेच्या फेऱ्या वाढवून देण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहे.